ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी – अमळनेरात निवेदन सादर..
अमळनेर : विक्की जाधव.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अमळनेर यांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची होत असलेली वेकायदेशीर घुसखोरी तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. शासनाने हैद्राबाद गॅझेट संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, यामुळे मूळ ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येत असून, शासनाचा निर्णय हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. याशिवाय शिंदे समितीच्या शिफारशींचा आधार घेत मोठ्या प्रमाणावर बनावट कुणबी नोंदी तयार करून आरक्षणाचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही परिषदेकडून करण्यात आला. “हा प्रकार ओबीसी समाजाशी सरळ अन्याय असून, प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी,” अशी मागणी यावेळी नोंदवण्यात आली.
यात विशेष करून चार ठोस मागण्या पुढे मांडण्यात आल्या – हैद्राबाद गॅझेट संदर्भातील शासन निर्णय रद्द करणे, बनावट कुणबी नोंदी रद्द करणे, शिंदे समितीच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या अन्यायाला आळा घालणे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा व कायदेशीर हक्कांचा संरक्षण करणे. “सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलनाची ठिणगी पडेल,” असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे.
