अमळनेरात बनावट शेतकरी दाखल्यांचा फज्जा – तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांची मोठी कारवाई..
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यात बनावट शेतकरी दाखल्यांच्या आधारे झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारावर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी धडक कारवाई केली आहे. खोटी कागदपत्रे सादर करून खरेदी केलेल्या तिन्ही जमिनींचे व्यवहार रद्दबातल ठरवत या मालमत्ता बोजाविरहित शासनजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या सूचनेनंतर सुरू झालेल्या तपासात अनेक प्रकरणांत दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानंतर मंगरूळ आणि देवगाव-देवळी शिवारातील शेतजमिनीवरील व्यवहार खोट्या शेतकरी दाखल्यांच्या आधारे झाल्याचे निष्पन्न झाले. संबंधित खरेदीदारांचे दाखले व व्यवहार तहसीलदारांनी रद्द करून शासनाच्या मालकीचा निर्णय सुनावला आहे.”शेतजमिनीवरील बोगस व्यवहार थांबवण्यासाठी कारवाई सुरू असून उर्वरित प्रकरणांवरही कायदेशीर निर्णय घेतला जाईल,” असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्पष्ट केले. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चर्चेला उधाण आले आहे.