करमाळा प्रतिनिधी:- करमाळा शहरामध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. प्रत्येक वर्षी विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आरास (देखावे) मंडळाच्या वतीने सादर केले जातात.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मानाचा तिसरा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या किल्ला विभागातील जुन्या कोर्टाजवळील लोकमान्य टिळक तरुण मंडळातर्फे जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर देखाव्याचे उद्घाटन व मानाच्या गणपतीची आरती उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम, तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम , API म्हस्के मॅडम व किल्ला विभागातील सर्व महिलांच्या हस्ते सायंकाळी ६:०० वाजता करण्यात येणार आहे.
सदर देखावा हा सध्याच्या काळात लग्नासाठी मुलांना मुली का मिळत नाही या ज्वलंत विषयावर आधारित आहे. तसेच विशेष बाब म्हणजे देखाव्यासाठी कोणत्याही यूट्यूब अथवा रील्स च्या कॉपी पेस्ट चा आधार न घेता स्वलिखित देखावा असून या देखाव्यासाठी बाहेरून कोणतेही कलाकार आणले नसून मंडळातील सदस्यांच्या सहकार्याने देखावा सादर केला जाणार आहे.
मागील वर्षीही या मंडळाने गोधन वाचवा या विषयावर जिवंत देखावा सादर करीत नागरिकांची मने जिंकत पोलीस स्टेशनचे पारितोषिक प्राप्त केले होते.
तरी करमाळा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी जुन्या कोर्टाजवळील लोकमान्य टिळक तरुण मंडळाचा देखावा पाहण्यासाठी आवर्जून यावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिपक सुरवसे, उपाध्यक्ष वासुदेव ढोके, खजिनदार इम्रान शेख व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.