अमळनेर ग्रामीण रुग्णालयात गणेश विसर्जन मिरवणुकीत जनजागृत..
अमळनेर : विक्की जाधव
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना, अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूकही विशेष ठरली. यंदा रुग्णालयाच्या गणेश मंडळाने पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा काढत समाजात एच.आय.व्ही/एड्स विषयावर जनजागृतीचा अनोखा संदेश दिला.

“जनसेवेचा गणराज” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाच्या उपक्रमामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. मिरवणुकीत आकर्षक फलक, घोषवाक्ये आणि जनजागृतीपर संदेश यांद्वारे लोकांना माहिती देण्यात आली. आरोग्यदायी समाज घडविण्यासाठी अशी सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. यावेळी डॉ. जी. एम. पाटील व डॉ. ताडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणेशोत्सव छान पार पडला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, समाजहितासाठी असलेले हे कार्य आणि उत्सवातील वेगळेपणा यामुळे अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचा हा गणेशोत्सव अनेकांच्या मनात घर करून गेला.