प्रभाग रचनेवर संतोष पाटील (भुरा आप्पा) चीं हरकत : संतुलन व भौगोलिक सीमांचा विचार करावा मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
नगरपरिषदेत नव्या प्रभाग रचनेवरून वादंग निर्माण झाला आहे. प्रभाग क्र. २ मधील नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक श्री. संतोष भगवान पाटील (भुरा आप्पा) यांनी नव्या रचनेवर औपचारिक हरकत नोंदवली आहे. त्यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकांना दिलेल्या निवेदनात सद्यस्थितीत केलेली लोकसंख्या विभागणी असमतोल असल्याचे स्पष्ट केले. काही प्रभागात जास्त तर काही प्रभागात अत्यल्प लोकसंख्या दाखविण्यात आल्याने नागरिकांचे प्रतिनिधित्व योग्य प्रकारे होणार नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करताना नैसर्गिक रचना व नागरिकांच्या सोयींचा पुरेसा विचार झालेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. विशेषतः विप्रो बोगदा व रेल्वे पूल परिसरातील नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, रेल्वे प्रशासनाने सदर बोगदा केव्हाही बंद होऊ शकतो, अशी नोटीस लावलेली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
तसेच जुन्या रचनेनुसार सिंधी कॉलनीचा समावेश पुन्हा प्रभाग क्र. २ मध्ये करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रभाग रचनेत जाती-धर्माचे प्रमाणदेखील योग्य पद्धतीने विचारात घेणे गरजेचे होते, असेही भुरा आप्पा यांनी स्पष्ट केले. “प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व व्हावे, कोणीही दुर्लक्षित राहू नये” यासाठी प्रभाग पुनर्रचना तात्काळ सुधारावी, अशी मागणी त्यांनी केली असून या हरकतीवर योग्य ती कार्यवाही करावी असा पुनरुच्चार निवेदनातून करण्यात आला आहे.