जळगाव पोलिसांची मोठी कारवाई – ७ महिन्यांपासून फरार असलेला रोड लुटीचा आरोपी जेरबं
अमळनेर : विक्की जाधव
जळगाव : तब्बल सात महिन्यांपासून पोलिसांना चकवत पळ काढणारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये रोड लुटीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत आरोपी अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करत आरोपीला जेरबंद केले.

धरणगाव, चोपडा व धुळे परिसरात झालेल्या सलग लुटीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली होती. आरोपीने टोळी तयार करून वाहतूकदार, दुचाकीस्वार यांना अडवून रोख रक्कम, मोबाईल, दागिने लंपास करण्याचा क्रम सुरू ठेवला होता. दरम्यान, विशेष मोहिम आखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवत गुप्त माहितीच्या आधारे धरणगाव तालुक्यात सापळा लावून आरोपीला पकडले. प्राथमिक चौकशीत आरोपीवर धुळे, जळगावसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये लुट, चोरी व जबरी चोरीचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून इतर फरार साथीदारांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.