साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे “पर्यावरण संवर्धन-संगोपन व श्रमसंस्कार छावणी” उत्साहात पडली पार
अमळनेर : विक्की जाधव
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक येथे “पर्यावरण संवर्धन-संगोपन व श्रमसंस्कार छावणी” उत्साहात पडली पार वृक्षारोपण करून प्रा. श्याम पवार, प्राचार्य अरविंद सराफ, कवी शरद धनगर, प्रा. सुरेश तात्या आणि स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील यांनी छावणीचे उद्घाटन केले. “खरा धर्म तो एकच धर्म” या प्रार्थनेने सुरुवात झाली, तर संविधानातील उद्देशिका विद्यार्थ्यांनी एकत्र वाचून सत्राला विशेष स्वरूप दिले. नंदुरबार, धडगाव, अमरावती, अहील्यानगर, संभाजीनगर, धुळे, भुसावळ, जळगाव आणि अमळनेर येथून तब्बल ६५ विद्यार्थी सहभागी झाले. “अधिकार मागताना कर्तव्य येतात, स्वातंत्र्य हवे असेल तर जबाबदारीही स्वीकारावी लागते” हा संदेश खेळ, गाणी, गोष्टी आणि संवादातून देण्यात आला.

“बलसागर भारत होवो” या गीताद्वारे भारत महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेम, ऐक्य आणि विविधतेतील एकात्मतेची गरज अधोरेखित करण्यात आली. मुलांनी डोंगरावर चढून निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. वृक्षमित्र योगेश चौधरी (शिंदखेडा) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
साने गुरुजींचे विचार, त्यांच्या समकालीनांचे कार्य, सामाजिक जबाबदारी, पारंपरिक खेळ, गाणी, गोष्टी, नृत्य तसेच जैवविविधतेविषयी माहिती या छावणीचे वैशिष्ट्य ठरले. समृद्धी देसले, आश्विनी वाघमोडे, शुभम पवार, तुषार पाटील, लोकेश वाणी, रेणुका लोहार, विशाखा राजपूत, शिव निकम, प्रणव पाटील, प्रथमेश चौधरी आणि समन्वयक गौरव महाले यांनी आयोजनात परिश्रम घेतले. अमळनेर व परिसरातील विविध मान्यवर, डॉ. सचिन पाटील, रणजित शिंदे, डॉ. लिना, अतुल चौधरी, साक्षी सोनार, तसेच अमरावती येथील साने गुरुजी विचारप्रेरित युवा साथी आकाश देशमुख, शाहू कल्याणकर यांच्यासह २० मान्यवर उपस्थित होते.