खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश – अमळनेर येथे चेन्नई-जोधपूर एक्सप्रेसचा थांबा मंजूर
अमळनेर : विक्की जाधव
खानदेशातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी 22663/64 चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस आता अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
हा निर्णय जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अमळनेरकरांच्या मागणीवर ठामपणे भाष्य केले. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या थांब्याला अधिकृत मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे अमळनेर व परिसरात आनंदाचे वातावरण असून खान्देश प्रवासी असोसिएशनसह सर्वसामान्य नागरिकांनी खासदार स्मिताताई वाघ यांचे आभार मानले आहेत. खासदार वाघ म्हणाल्या, “ आता ही गाडी सुरू होऊन अमळनेरच्या सर्वांगीण विकासातं भर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या प्रयत्न नाही यश मिळाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखीही प्रयत्न सुरूच राहतील.”