अवघ्या 12 तासांत मोटरसायकल चोरटा पोलिसांच्या ताब्यात अमळनेर पोलिसांची कार्यवाही
अमळनेर : विक्की जाधव
दिनांक 22 जुलै 2025 रोजी दुपारी 1.00 ते 2.30 वाजेच्या सुमारास चिकाटी गल्ली येथील सद्दाम हुसेन यांच्या घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH 19 AS 3590) मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेची तक्रार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे दाखल होताच तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव व उदय बोरसे यांच्या पथकाने चोरीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या माहितीवरून गुप्त बातमीदारांच्या मदतीने धुळे शहरातील पांझरा नदीकाठी अंजन शाह बाबा दर्गा परिसरात संशयितास ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीने आपले नाव अरशद अकबर शहा (वय 19, रा. 80 फुटी रोड, भोला बाजार, धुळे) असे सांगितले. त्याच्याकडून चौकशीत चोरी केलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.