पाकिस्तानात रामायणाचे भव्य रंगमंचीय सादरीकरण: AI च्या सहाय्याने महाकाव्याला आधुनिकतेची झलक

नवी दिल्ली/वर्षा चव्हाण
कराची, पाकिस्तान :
पाकिस्तानात एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षण साकार झाला आहे. कराची शहरातील मौज या प्रसिद्ध पाकिस्तानी नाट्यसंस्थेने हिंदू धर्मातील महान महाकाव्य रामायणचे आधुनिक रंगमंचीय सादरीकरण सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. हे नाट्यप्रयोग कराची आर्ट्स कौन्सिलमध्ये ११ ते १३ जुलै दरम्यान पार पडले.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून पारंपरिक कथेला आधुनिक दृश्य तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. झाडांची हालचाल, महालांची भव्यता, जंगलातील शांतता यांसारखी दृश्ये AI च्या मदतीने प्रभावीपणे रंगमंचावर उभी करण्यात आली, ज्यामुळे प्रेक्षकांना एखाद्या जादुई जगात प्रवेश केल्यासारखे वाटले.
नाटकाचे दिग्दर्शन योहेश्वर करेरा यांनी केले असून, प्रमुख भूमिकांमध्ये राणा काझमी (सीता), अश्मल ललवाणी (राम), आणि सामन गाझी (रावण) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्यासोबत आमिर अली (राजा दशरथ), वकास अख्तर (लक्ष्मण), जिब्रान खान (हनुमान), सना तोहा (कैकेयी) आणि अली शेर (अभिमंत्री) यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
हे नाटक प्रथम नोव्हेंबर २०२४ मध्ये The Second Floor येथे सादर झाले होते. प्रेक्षकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्याचे आता अधिक भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध सादरीकरण कराची आर्ट्स कौन्सिलमध्ये करण्यात आले.
पाकिस्तानसारख्या मुस्लिम बहुल देशात रामायणासारख्या हिंदू धार्मिक ग्रंथावर आधारित नाटकाचे खुले मनाने स्वागत होणे, हे सहिष्णुतेचे, सांस्कृतिक आदानप्रदानाचे आणि कलात्मक मुक्ततेचे एक सकारात्मक उदाहरण मानले जात आहे. या नाटकाने धार्मिक आणि सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये संवाद व सर्जनशीलता वाढवण्याचे सामर्थ्य दर्शवले आहे.