राजवड (आदर्शगाव) येथील “राज फार्म”वर सिंदूर लागवडीचा यशस्वी प्रयोग!
अमळनेर : विक्की जाधव.
१५ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आलेल्या सिंदूर रोपांची यशस्वी लागवड झाली असून, अवघ्या १५ महिन्यांतच प्रथम उत्पादन घेण्यात यश आले आहे. एकूण ३५ झाडांपासून प्रती झाड १ किलो या प्रमाणात ३५ किलो सिंदूर उत्पादन मिळवण्यात आले आहे.
सामान्यतः सिंदूर झाडाचे उत्पादन येण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, योजनाबद्ध शेती, शास्त्रीय पद्धती आणि निगुतीच्या प्रयत्नांमुळे हा प्रयोग अल्पावधीतच फळाला आला आहे.
सिंदूरचे वैशिष्ट्य:
सिंदूर झाडावर लालसर रंगाची फळे येतात. ती सुकल्यानंतर त्यातून बीया वेगळ्या करून सावलीत वाळवतात व बारीक दळून कुंकवाचा पावडर तयार केला जातो. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे संपूर्णतः सुरक्षित आणि रासायनिक कुंकवाच्या तुलनेत गुणकारी असते.
सिंदूरचा उपयोग:
हिंदू संस्कृतीत सौभाग्यचिन्ह म्हणून विवाहित महिला सिंदूर वापरतात.याचा वापर नैसर्गिक खाद्य रंग म्हणूनही केला जातो.त्वचेसाठी सुरक्षित असल्यामुळे औषधनिर्माण आणि सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात याचे महत्त्व वाढले आहे.
धार्मिक विधी, पूजापाठ आणि पारंपरिक उत्सवांमध्ये नैसर्गिक सिंदूर अधिक पवित्र मानला जातो.
राज फार्मवरील या यशस्वी प्रयोगामुळे नैसर्गिक उत्पादनांची बाजारातील मागणी लक्षात घेता, भविष्यात शेतकऱ्यांसाठी उत्पन्नवाढीचा नवा मार्ग निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.