पोलीस सेवेतील उच्चशिक्षित कर्मचारी स्वेच्छानिवृत्त; समाजसेवेचा आणि मार्गदर्शनाचा वसा घेणार हाती
अमळनेर : विक्की जाधव.
पोलीस खात्यातील ताणतणाव, वाढलेला कामाचा व्याप आणि मानसिक-शारीरिक तणाव यामुळे अमळनेर पोलीस ठाण्यातील एक उच्चशिक्षित आणि संवेदनशील हेडकॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन यांनी वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. निवृत्तीनंतर समाजसेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
२००४ साली पोलीस सेवेत दाखल झालेले महाजन हे इतिहास, इंग्रजी आणि जनरल विषयांचे पदवीधर असून एम.ए., बी.एड. शिक्षण घेतले आहे. त्यांनी NET, SET सारख्या स्पर्धा परीक्षाही यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत. त्यांना वाचन, लिखाणाची विशेष आवड असून विचारशील वृत्ती व समाजाभिमुख दृष्टिकोन त्यांच्यात आहे.
२४ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी कुटुंबासह पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली. पोलीस सेवेमुळे निर्माण होणारा मानसिक आणि शारीरिक ताण हाच मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अधीक्षकांनी त्यांच्या निवृत्तीला मंजुरी देत २ जून २०२५ पासून सेवा मुक्ततेस परवानगी दिली आहे.
निवृत्तीनंतर महाजन हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेणार आहेत. यासोबतच मानसिक रुग्ण, वृद्ध, निराधार, अनाथ आणि अबला महिलांसाठी समाजसेवा आणि जागृतीपर लिखाण करण्यात ते लक्ष घालणार आहेत.
सुनील महाजन यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक वाटचाल नसून, समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची प्रेरणादायी जाणीवही आहे. अशा संवेदनशील, विचारवंत अधिकाऱ्यांची उणीव खात्यात जरूर भासेल, मात्र समाजासाठी ते नवे कार्यक्षेत्र खुले करत आहेत.