मन मोकळे करणारे मनोगत
( भाग शेवटचा)
मी आजवर शेकडो लेख लिहिले परंतू माझी लेखणी कधीच अडली नाही. एकटाकी पद्धतीचे माझे लेखन असते. शब्दांनो मागुते या ! अशी आर्जवं कधीच करावी लागली नाहीत. शब्द अविरतपणे माझ्या लेखणीत अवतरतात. हे लिहिताना मी परिणामांची, लाभ- हानी वा राग- लोभाची कधीच पर्वा केली नाही. माझे लेखन हे फणसासारखे बाहेरून काटेरी असले तरी आत समाजहिताचे गोड गरे असतात. माझ्या लेखनामुळे जे दुखावतात ते नारळाची कवटी फोडावी तशी माझ्यावर टीकेची झोड उठवतात परंतू कवटी फोडल्यानंतर त्यांना माझ्या अंतरंगातील गोड पाणी व मधुर आरोग्यदायी खोबरं मिळतं तेव्हा ते अंतर्मुख होतात.तेंव्हाच त्यांना माझ्या लेखनाचे महत्व पटते.
आज माझ्या मनातील मनोगताचा शेवटचा भाग लिहिताना माझी महाभारतातील अर्जूनासारखी द्विधा मनस्थिती झाली आहे. समोर तर सर्व आप्तस्वकिय आहेत मग मी लढू तरी कोणाविरूध्द व कशासाठी ? तेव्हा माझा सारथी श्रीकृष्ण (माझे अंतर्मन) मला बजावतो- ही लढाई धर्म व अधर्मा
विरोधातील आहे. तू शस्त्र टाकू नको लढ ! म्हणून मी गेले काही दिवस माझे मनातले साठलेले मनोगत व्यक्त करीत आहे. त्यात व्यक्ती द्वेष नाहीतर प्रवृत्ती विरोध आहे.
या मनोगताचा शेवट मी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावरील लेखाने करणार आहे,असे जाहिर करताच काही चिंतातूर जंतू वळवळू लागले.हा सुद्धा गद्दार गटात सामिल होतो की काय ? याच साठी सर्व चालले होते का ? एक ना अनेक कुशंका. परंतू मी त्यांचा अपेक्षा भंग करणार आहे. चितातूर जंतूंनो ! मी शिंदे गटात तर मुळीच जाणार नाही.परंतू या निमित्ताने मी जो शिवसेनेचा इतिहास लिहित आहे व निष्ठावंतांच्या व्यथांची जखम उघडून दाखवत आहे त्यात कोणावरही अन्याय होऊ नये, ही माझी भावना आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विषयी नव्याने काही लिहिण्यापुर्वी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी मी लिहिलेला लेख येथे पुन्हा नमुद करीत आहे. सदर लेख शिवसेना एकसंघ असतानाचा आहे हे लक्षात घ्यावे.त्यामुळे मला आत्ताच एकनाथ शिंदे बाबत कळवळा का आला ? या शंकेला मुठमाती मिळेल. वाचा हाच तो लेख-
एकनाथ संभाजी शिंदे
दिघेसाहेबांची सावली
आज एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री व शिवसेना नेते असल्याने त्यांच्या वाढ दिवसाच्या शुभेच्छा देण्याची स्पर्धा लागली आहे. होर्डींग्स तर जागोजागी लागल्या, वृत्तपत्रांनी विशेषांक काढण्याचा घाट घातला.ही झाली उगवत्या व तळपत्या सूर्याला नमस्कार करण्याची वृत्ती.
मी एकनाथ शिंदे यांचे अभिष्टचिंतन ते एक मंत्री, नेते आहेत म्हणून अजिबात करणार नाही. त्यांचे अभिष्टचिंतन करायचे झाले तर आनंद दिघे साहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून करेन. त्याहीपेक्षा जास्त महत्वाची बाब म्हणजे दिघे साहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ठाणे शिवसेना पोरकी झाल्यावर त्यांनी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणे सांभाळून शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू ठेवली ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. दिघे साहेबांच्या नंतर शिवसेना सांभाळणे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. ते ये-या गबाळ्याचे काम नव्हते.ही अशक्यप्राय बाब त्यांनी शक्य करून दाखवली, यासाठी एकनाथ शिंदे हे अभिनंदनास पात्र आहेत. दिघे साहेब आपल्यात नसले तरी ते एकनाथ शिंदेंच्या रूपाने वावरत आहेत, असे वाटते. ते दिघे साहेबांची सावली वाटतात. त्यांच्या वाढ दिवसा निमित्त अभिष्टचिंतन करताना मला यासाठीच ‘आनंद’ होत आहे.
एकनाथ शिंदे यांचा जन्म गरीब कुटुंबात ९/०२/१९६३ रोजी झाला.त्यांनी रिक्षा चालक, टेम्पो ड्रायव्हर व फिशरी कंपनीत मच्छीमारीचेही काम केले. नगरपालिका शाळेत शिक्षण घेतले.किसन नगर विभागातील एक तरूण दिघेसाहेबांनी अचूक हेरला.वयाच्या १८ व्या वर्षापासून ते शिवसैनिक झाले.शिवसेनेच्या संघर्षमय व प्रतिकूल काळात काम करणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत दिघेसाहेबांनी एकनाथ शिंदे या तरुणावर शाखा प्रमुख पदाची जबाबदारी टाकली. ते १५ वर्षे किसननगर शाखेचे शाखाप्रमुख होते. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.बेळगाव कारवार आंदोलनात पोलीसांचा लाठीमार खावा लागून व तुरुंगवासही भोगावा लागला.दिघे साहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून ते त्यांच्या परिक्षेत खरे उतरले होते.आणि आनंद दिघे या पंचाक्षरी मंत्रांचा परीसस्पर्श झाल्यावर काय होते ? याचे एक उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे. १९९७ साली एकनाथ शिंदे सर्वप्रथम नगरसेवक म्हणून ठाणे महानगरपालिकेत निवडून गेले.आणि दुस-या टर्म मधे ते सभागृह नेते झाले.त्यांची ही कारकिर्द खुपच गाजली व संस्मरणीय ठरली.याच दरम्यान दिघे साहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि वज्राघात झाला.आता शिवसेनेला वाली कोण हा गंभीर प्रश्न उभा राहिला. सुरूवातीस मनोहर आंबवणे व नंतर रघुनाथ मोरे यांना ही जबाबदारी दिली. पण हे शिवधनुष्य पेलण्यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत.अखेर दिघे साहेबांच्या मुशीत तावून तावून सलाखून तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर ही जबाबदारी विश्वासाने टाकण्यात आली आणि जणूकाही दिघेसाहेबच एकनाथ शिंदें मधे संचारल्याप्रमाणे त्यांनी ठाणे जिल्ह्याचा कारभार २००५ साली हातात घेतला व शिवसेनेच्या यशात व वैभवात भर टाकत गेले.
तत्पूर्वी २००४ साली ते आमदार म्हणून निवडून आले, २००९ साली त्यांची जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली. यापाठोपाठ २००९, व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार झाले व आमदारकीची हॅटट्रिक साधली.२०१४ साली त्यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली. विद्यमान विधान सभेत त्यांना प्रथम सार्वजनिक बांधकाम मंत्री या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली व गेल्याच महिन्यात त्यांना आरोग्य मंत्रीपदही बहाल करण्यात आले.
या संपूर्ण कालखंडात त्यांनी ठाणे जिल्ह्यावरील शिवसेनेची पकड किंचितही कमी होऊ दिली नाही किंबहूना आमदार, खासदार व महापौर तसेच नगराध्यक्ष ही निवडून आणले व शिवसेनेची सत्ता ठाणे जिल्ह्यात अबाधित राखली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ही विश्वास संपादन करण्याची किमया एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हे करीत असताना गुळाला मुंगळे चिकटतात तसे अनेक स्वार्थी व संधीसाधू त्यांच्या आसपास दिसतात.तसेच ज्यांनी १० वर्षापुर्वी एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळून मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तेही आज त्यांचे खंदे समर्थक म्हणवून उमेदवारीची लालसा बाळगून आहेत.अशा संधी साधू, सत्ता लोलूप लोकांना कसे खड्यासारखे दूर ठेवायचे ? याचीही खबरदारी त्यांना घ्यावी लागेल.आगामी लोकसभा व विधान सभा निवडणूकीचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.एकनाथ शिंदे या मैदानात बाजी मारतील, याबद्दल शिवसैनिकांना शंका नाहीच. युती झाली तर एकत्र न झाली तर स्वबळावर निवडणूक लढवायच्या आहेत. शिवसेनेस बहुमत मिळाले तर ते भावी मुख्यमंत्री असतील याबद्दल कोणाचेही दुमत नसावे, आणि किमान उपमुख्यमंत्री पदी तरी ते दिसतीलच.
एका गरीब सर्वसामान्य कुटुंबातील तरूण ज्याने आपल्या करियरची सुरूवात एक रिक्षा ड्रायव्हर म्हणून केली नंतर शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेता, जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना नेते व आमदारकीची हॅटट्रिक साधून प्रथम विरोधी पक्ष नेता व नंतर कॅबिनेट मंत्रीपद भूषविले असे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब व तमाम शिवसैनिकांप्रमाणेच महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेस अत्यानंदच होईल. एकनाथ शिंदे यांचा पुढील वाढ दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने महाराष्ट्र साजरा व्हावा, ही सदिच्छा व आई भवानीच्या चरणी प्रार्थना !!
हा लेख एकनाथ शिंदे यांनी पक्षद्रोह करून गद्दारी केल्या नंतरचा आहे.सन २०२२ मध्ये त्यांनी पक्ष प्रमुख गंभीर आजारी असताना भाजपाशी संगनमत करून पक्ष फोडण्याचे जे पातक केले ते अक्षम्य होते.दिघे साहेबांचा शिष्य म्हणवणा-याला हे शोभणारे खचितच नव्हते. मी वरील लेखात म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांनंतर ठाण्याची शिवसेना सांभाळली व दिघे साहेबांची कमतरता काही अंशी कमी केली शिवसैनिकांना प्रेम दिले यामुळेच त्यांच्या बाबत आदर व्यक्त केला. परंतू त्यांनी आपली कंपुगिरी सुरू केली व आपला समर्थक गट तयार करून अनंत तरे सारख्यांना डावलले हे पटत नव्हते.ते माझ्या पेक्षा ८ वर्षांनी लहान व पक्षात १०-१२ वर्षे ज्युनियर असल्याने मी हातचे अंतर राखून होतो. १८ वर्षापूर्वी जेव्हा राजेंद्र चौधरी यांना शहर शाखा प्रमुख बनविण्यासाठी एक शिष्टमंडळ जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते.माझ्या सहकारी माजी नगरसेवकांनी मला आग्रह करून मला आनंद आश्रमात नेले. मला पाहताच एकनाथ शिंदे उद्गारले होते- अरे दिलीप मालवणकर सारखा ज्येष्ठ शिवसैनिक तुमच्या सोबत आहे तर तुम्ही सुभाष देसाई साहेबांकडे त्यांना घेऊन जा.त्या प्रमाने मी गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन सुभाष देसाई साहेबांकडे वस्तुस्थिती मांडली व त्यांना ती पटल्याने तेव्हा राजेंद्र चौधरी यांना शहर प्रमुख म्हणून नेमण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडलीच नाही तर ती फोडली.पक्ष प्रमुख आजारी असताना त्यांनी भाजपाशी संगनमत करून शिवसेना पक्ष फोडला.
त्यांनी छगन भुजबळ, गणेश नाईक,
नारायण राणे प्रमाणे पक्षांतर केले असते तरी हरकत नव्हती. त्यांनी स्वबळावर स्वतंत्र पक्ष काढायलाही हरकत नव्हती. परंतू ४० आमदार व १२ खासदारांना फितवून भाजपाच्या दावणीला बांधले हा त्यांचा अक्षम्य अपराध होता. इतकेच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी भाजप व निवडणूक आयोगाशी संगनमत करून शिवसेना हे नाव व चिन्ह ही पळवले. ही बाब गद्दारीपेक्षा किती तरी मोठी होती.
या नंतर माझ्या लेखणीने रूद्रावतार धारण करून जे तांडव केले ते महाराष्ट्राने पाहिले. समाज माध्यमांवरून रोजच्या रोज माझ्या लेखांच्या तोफा धडाडू लागल्या. एकीकडे पक्षप्रमुखांनी संयमाची भूमिका जाहिर केली असताना मी सतत बरसत होतो.या लेखांचा संग्रह “गद्दारांना क्षमा नाही” मी स्वखर्चाने प्रकाशित केला.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर प्रकाशन केले. हा लेख संग्रह महाराष्ट्रभर गाजला परंतू मातोश्रीने या संग्रहाच्या पाच प्रतीही विकत घेतल्या नाहीत. जिथे दिग्गज म्हणवणारे नेते व स्थानिक पुढारी एकनाथ शिंदे यांच्यावर जाहिर टीका करण्यास धजावत नव्हते तिथे मी जाहिर व्यासपीठावरून टीकेची झोड उठवित होतो. काही वेळा तर मला व्यासपीठावरून चिठ्ठी येई की, इतके जहाल बोलू नका.मी ऐकत नाही म्हणताच काही नेते व्यासपीठावरून पायउतार होत.कारण एकच केसची भीती. याच वेळी काही स्थानिक नेते दोन्ही मांडवाचे व-हाडी बनले होते.
वरकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरें सोबत तर आतून एकनाथ शिंदे ला मिळालेले. हळूहळू हा बुरखा फाटत गेला. शिवसेनेचा तत्कालीन जिल्हा प्रमुख व शहर प्रमुख हे एकनाथ शिंदेला शरण गेले. परंतू मातोश्री “त्यांची मजबूरी” असे नाव देत त्यांच्या बद्दल सहानूभूती बाळगत आहे. हे कल्याण येथील निवडणूक प्रचार सभेत व नुकत्यात मातोश्री वर झालेल्या मिटींग मध्ये ” भाऊ कसे आहेत ? अशी आस्थेवाईकपणे चौकशी करून सिद्ध केले. अंबरनाथच्या वाळेकरांबाबतही हीच सहानूभूती दिसून येते. एकीकडे आम्ही फुकटचे वैर पत्करून निष्ठेचे तुणतुणे वाजवायचे आणि गद्दाराबद्दल सहानूभूती व आमची उपेक्षा ही परिस्थिती मला संभ्रमित करणारी आहे.
आत्ता मुळ विषयावर येतो. एकनाथ शिंदे यांनी पक्षद्रोह केला याचे समर्थन मी करणार नाही. परंतू ती परिस्थिती निर्माण व्हायला जबाबदार कोण ? एकट्या एकनाथ शिंदेंचा विषय असता तर समजून घेता आले असते.परंतू ४० आमदार व १२ खासदार इतकी टोकाची भूमिका का घेतात ? याचा विचार करावाच लागेल.
ज्या कारणाने राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली ते कारण होते “माझ्या पांडूरंगाला बडव्यांनी घेरले.”बाळासाहेबांनंतरही, ही परिस्थिती बदललेली नाही. बडवे तेच आहेत मात्र पांडूरंग बदलेला आहे. काही बडवे व बडव्या शिंदे गटात गेले. कारण काही नवीन बडवे निर्माण झाले.
बाळासाहेबांचा अपमान करणारे व हिंदू देवतांची टिंगल करणारे तसेच शिवसेना विरोधक, नेते पदाचा मकुट घालून मिरवू लागले तर निष्ठावंतांचा अपमान होऊ लागला. तुम्ही मान देऊ शकत नसलात तरी किमान अपमान करू नका ! अशी भावनाही पायदळी तुडवली गेल्याने स्वाभिमानी शिवसैनिक व नेते दुरावू लागले.त्यांना जवळ करण्याऐवजी “ज्यांना जायचे असेल त्यांनी जावे,मी कोणाला अडवणार नाही !” हे धोरणही घातकी ठरले. निवडणूक काळात नवख्यांना दिलेली उमेदवारी पारदर्शक म्हणता येणारी नव्हती.त्यामुळे वर्षानुवर्षे विधानसभा व लोकसभेची तयारी करणारे निष्ठावंत नाराज झाले. पद व तिकिट वाटप करताना गैरव्यवहार होऊ लागले. एका माजी खासदाराच्या दारात दोन मर्सिडीज उभ्या असलेल्या मी स्वतः पाहिल्या आहेत.पदाच्या बदल्यात दीड लाखाचे महागडे घड्याळ घेणारा माजी खासदार मला ठाऊक आहे. एका मेत्याला पत्कारांनी विचारले ही मर्सिडीज कोणी दिली तर ते बोलले ही माझ्या भावाची आहे.तर वरील माजी खासदार मला सांगतो ती माझ्या मुलीच्या नावावर आहे.तिच्या नावावर कर्ज घेतले आहे.
मी एकनाथ शिंदें बाबत टोकाची टीका केली.कोणताही घरबंद ठेवला नाही. सर्व मर्यादा ओलांडल्या.एखाद्या अंधभक्ता प्रमाणे मी पक्ष प्रमुखांची बाजू एकतर्फी मांडत राहीलो. माझी पत्रकारिता एकांगी लेखन करून कलंकित केली. कारण एकच, आपला पक्ष व पक्ष प्रमुख अडचणीत आहे त्यांना right or worng साथ द्यायची. त्यासाठी मी एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थर्कांवर तुटून पडलो. तेव्हा आपला आप्त, मित्र, सखा हे काहीच पाहिले नाही.बेछूट लिहित राहिलो.
इतके जहाल लिखाण करूनही एकनाथ शिंदे वा त्यांच्या समर्थक आमदार खासदार वा पदाधिका-यांनी कधीही माझ्याशी वाद घातला नाही वा मला ट्रोल केले नाही किंवा मला धमकी दिली नाही किंवा दबाव आणला नाही.कोणतेही आमिष दाखवले नाही किंवा पक्ष सोडण्याबाबत ऑफर दिली नाही.त्यांनी एक प्रकारे माझ्या पत्रकारितेचा व माझ्या ज्येष्ठत्वाचा मान राखला.इतकेच नव्हे तर मी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका केली तरी मला उलट जबाब विचारला नाही. या उलट ज्यांच्या चरणी मी निष्ठा वाहिली; पत्रकारितेचा गैरवापर करून एकतर्फी लेखन करून पाठराखण केली, त्यांनी माझ्या एका लेखातील कोतेपना या एका शब्दावरून मला ट्रोल केले, मला धमक्या दिल्या. इतकेच नव्हे तर माझ्यावर बिनबुडाची व चरित्र्यहनन करणारी टीका केली व मारेकरी पाठवले मग तुमच्या पेक्षा एकनाथ शिंदे लाख पटीने चांगला.टीका सहन करण्याची व संवैधानिक अधिकाराची बूज तरी राखतो.
एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेत मिसळणारे लोकनेते आहेत.जनतेच्या संकटकाळी धावून जातात.शिवसैनिकांवर दिघे साहेबांसारखे प्रेम करतात,त्यांच्या सुख दु:खात सहभागी होतात.प्रसंगी आर्थिक मदतही करतात.माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही ! असे कधीच बोलत नाहीत. तुम्ही आर्थिक मदत करू नका, परंतू शिवसैनिकांवर प्रेम करायला पैसे लागत नाहीत.प्रेमाने पाठीवर हात फिरवून फक्त लढ म्हटले तरी शंभर हत्तींचे बळ संचारते.वाढ दिवसाला शुभ संदेश पाठवला तरी शिवसैनिकांची छाती अभिमानाने फुलते. हे जर एकनाथ शिंदे यांना जमते तर ते तुम्हाला का जमू नये. मातोश्रीवरील बडवे साधी भेट घडू देत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली हे ठाऊक असूनही शिवसैनिक तिथेच धाव घेत आहेत.सर्वच जण मतलबी नसतात, पैश्याचे भुकेले नसतात.जिथे मान सन्मान राखला जातो तिथेच कार्यकर्यांची रिघ लागते.हे कधी समजणार ?
मी ५२ वर्षे शिवसैनिक म्हणून निष्ठावंत म्हणून जगलो.मला पक्ष प्रमुख ५-१० मिनिटांची वेळ देत नाहीत व गद्दारांबद्दल आजही सहानूभूती बाळगतात, हीच माझी खरी व्यथा आहे. पक्ष प्रमुख सोडा माजी खासदार विनायक राऊत, नामधारी संपर्क नेते ज्यांचा कणाच नाही असे गुरूनाथ खोत किंवा जिल्ह्यातील नेते उपनेते व जिल्हा प्रमुखाकडून तर अपेक्षाच नाही असे लोक माझ्या सारख्याची दखल घेत नसतील तर माझ्या लेखन सामर्थ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेणे इतकाच या लेख मालेचा हेतू आहे. मी कंटाळून वा वैतागून पक्ष सोडून जाईन असे कोणाच्या डोक्यात किडे वळवळत असतील त्यांनी ही बेगॅनस्प्रेची फवारणी समजावी.
निष्ठावंत शिवसैनिकांना
जय हिन्द ! जय महाराष्ट्र !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
दिनांक २७ मे २०२५