कामाच्या वेळेत वाढदिवस साजरा; अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार?
अमळनेर : विक्की जाधव.
शासकीय कामकाजाच्या वेळेत नगर परिषदेच्या कार्यालयात औषधी भंडारपालाच्या वाढदिवसाचे आयोजन करून कामकाज ठप्प केल्याप्रकरणी अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस नगरपालिका शाखा अमळनेरचे सचिव रघुनाथ रामभाऊ मोरे यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कार्यवाही सुरू झाली आहे. या तक्रारीत, श्री. नेरकर यांनी कार्यालयीन वेळेत पालिकेच्या दालनात वाढदिवस साजरा करून कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विकास शाखेचे सह आयुक्त यांनी श्री. तुषार नेरकर यांच्याकडून खुलासा मागवला असून, त्यांनी आपला स्पष्ट अभिप्राय उलट टपालीनं कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणामुळे अमळनेर नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.