मुख्यमंत्री सहाय्यता निधी आता व्हॉट्सअपवर – रुग्णांसाठी मोठा दिलासा!
मुंबई(प्रतिनिधी,वर्षा चव्हाण)
राज्यातील रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची संपूर्ण सेवा आता थेट ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने मेटा (Meta) कंपनीसोबत करार करून या सुविधेला सुरूवात केली असून, नागरिकांना सहज व जलद सेवा मिळवता यावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आरोग्याशी संबंधित सर्व योजना एकाच पोर्टलवर आणण्यात येणार असून, अर्ज प्रक्रियाही सुलभ केली जाईल.
⚫सीएसआर निधीतून अधिक आर्थिक मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवश्यक असलेला निधी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून मिळवण्यात येणार आहे. यासाठी खास स्वतंत्र संस्था स्थापन केली जाईल, जी सीएसआर निधी संकलनाचे काम करेल आणि नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवेल. ही संस्था सरकार आणि कंपन्यांदरम्यान मध्यस्थ म्हणून काम करणार आहे.
🟣कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि पारदर्शकतेवर भर
या नव्या योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रुग्णाला कोणत्या योजनेचा लाभ मिळणार, आधी कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे, आणि कोणत्या आजारावर किती मदत मिळाली – याची सर्व माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.
🟤रुग्णालयांची संलग्नता वाढवणार
अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा यासाठी राज्यातील रुग्णालयांची संलग्नता वाढवून त्यांना पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना नजीकच्या रुग्णालयातच सुविधा मिळणे शक्य होईल.
ही योजना कार्यान्वित झाल्यास, रुग्णसेवेत मोठी सुधारणा होणार असून, गरजू नागरिकांना वेळेत मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.