उध्दव राजचे सुवर्ण युग येणार !
महाराष्ट्राला १८ वर्षांपूर्वी एक दु:स्वप्न पडले आणि ठाकरे कुटुंबात फुट पडली. ते ही हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या हयातीत. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत तसेच एकाच जंगलात दोन वाघ राज्य करू शकत नाहीत हे सिद्ध झाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे सुपुत्र असले तरी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा नव्हती.एक जागतिक दर्जाचा छायाचित्रकार राजकारणात रमेल असे कोणालाही वाटले नव्हते. १९९५ पर्यंत तरी उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते.२००३ साली मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचार मोहिमेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस खरी सुरूवात झाली.
वाढत्या वयामुळे बाळासाहेबांना आपला उत्तराधिकारी कोण असावा ? याची चिंता वाटत होती.राज ठाकरे हे सुरूवाती पासून शिवसेनेत सक्रिय होते.त्यांची राजकीय कारकिर्द १९९० पासून सुरू झाली.ते बाळासाहेबांसारकेच उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते व आहेत. विद्यार्थी सेने पासून त्यांचे नेतृत्व ख-या अर्थाने उदयास आले होते.युवकांच्या गळ्यातील ते ताईत बनले होते. त्यांची देहबोली, वक्तृत्व व भाषाशैली ही हुबेहुबे बाळासाहेबांसारखी होती. ते बाळा
साहेबांचे प्रतिरूपच वाटत होते. बाळासाहेबांनंतर कोण ? याची जेव्हा जेव्हा दबक्या आवाजात चर्चा होत असे तेव्हा “राज ठाकरे” हेच सर्वांचे उत्तर असे.
राज ठाकरे हे जहाल भाषा शैली, स्पष्टवक्तेपणा व ठाकरी बाण्यामुळे लोकप्रिय होते.लाखोंची गर्दी खेचण्याची किमया त्यांच्यात होती व अजूनही आहे. दैनिक सामना १९८९ साली सुरू झाला तेव्हा सामनाच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग मोठा होता.
दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सूर्यपुत्र असले तरी त्यांच्यात सूर्याचे तेज नव्हते. ते लाजरे बुजरे व मवाळ स्वभावाचे होते. सुरूवातीस तर त्यांच्या वक्तृत्वातही जोम नसे. कालांतराने त्यांनी वक्तृत्वात बाजी मारली परंतू त्याला ठाकरी भाषेचा बाज नव्हता.त्यामुळे बाळासाहेबांचा खरा वारसदार म्हणून राज ठाकरेंना असलेली पसंती कायम राहीली.
मध्यंतरी किणी प्रकरणामुळे राज ठाकरे अडचणीत आले होते व त्यांची प्रतिमा डागाळल्यासारखी झाली होती.
बाळासाहेब ही आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या मन:स्थितीत होते. उद्धव की राज यातून निवड करणे बाळासाहेबांनाही अवघड वाटत होते.अखेर महाबळेश्वर येथील शिबीरात आपला उत्तराधिकारी नेमण्याचा सर्वाधिकार शिवसेना पदाधिका-यांना दिला. स्वतः बाळासाहेब त्यावेळी उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत हा निर्णय घ्यायचा होता. पदड्यामागे काय घडले सांगता येत नाही मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कार्याध्यक्ष म्हणून नेमण्याचा ठराव मंजूर झाला व त्या ठरावाचा प्रस्ताव राज ठाकरे यांनीच मांडला होता.याचे त्यावेळी व अजूनही शिवसैनिकांना गुपित कळले नाही.
अशा प्रकारे राज ठाकरे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून उदय झाला. पक्ष नेतृत्व दोन लोकांत विभागले जावे अशी अनेकांची इच्छा होती. बाळासाहेब ही त्यास अनुकूल होते.परंतू “मुंबई माझ्या कडे हवी” असा अट्टाहास राज ठाकरेंनी धरला. त्यामुळे ती संकल्पना साकार होऊ शकली नाही. तेव्हा पासूनच गृह कलह म्हणा वा भाऊबंदकी सुरू झाली.राज ठाकरेंना डावलले जाऊ लागले. “माझ्या पांडूरंगाला बडव्यांनी घेरले” अशी खंत राज ठाकरे उघडपणे व्यक्त करू लागले. राज ठाकरे हा स्वाभिमानी तसेच हट्टी माणूस. रोखठोकपणा हा ठाकरी बाणा अंगात मुरलेला. त्यांची पक्षांतर्गत कोंडी होऊ लागली.अखेर त्याचा स्फोट होऊन राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीतच २००६ साली बंड करून आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष निर्माण केला.त्या पाठोपाठ राज ठाकरे यांना मानणारे हजारो शिवसैनिक व शेकडो पदाधिकारी राज ठाकरेंसोबत गेले.शिवसेनेने या पुर्वी अनेक बंडं पचवली होती.अगदी बंडू शिंगरे पासून छगन भुजबळ, नारायण राणे ते गणेश नाईकांपर्यंत.परंतू यावेळी अभेद्य मानल्या जाणा-या मातोश्री च्या बालेकिल्याला सुरूंग लागला होता. मात्र राज ठाकरे यांनी शिंदे सारखी गद्दारी केली नाही. पाठीत खंजीरही खुपसला नाही. बाळासाहेबांना पुर्वकल्पना देऊन व त्यांचे आशीर्वाद घेऊनच पक्ष सोडला.तसेच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारखे फोडाफोडीचे राजकारण अजिबात केले नाही.राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे लोक त्यांच्यासोबत आले त्यांनाच सोबत घेतले. शिंदेसारखी फोडाफोडी व ब्लॅकमेलिंग अजिबात केली नाही. त्यांनी बाळासाहेबांच्या नावावर,पक्षावर वा चिन्हावर दावा केला नाही.स्वतःच्या बळावर आपला पक्ष निर्माण केला व तो टिकवला. शिंदे सारखे ते भाजपाच्या हातातील बाहुले बनले नाहीत.
या मुळेच राज ठाकरे यांच्या बंडाला कोणी गद्दारी म्हणू शकले नाही. त्यांनी कधीही शिवसेना संपवण्याची भाषा केली नाही.म्हणून आजपर्यंत राज ठाकरे यांना मानणारे लाखो शिवसैनिक आहेत. जे राज ठाकरेंसोबत गेले तेही १८ वर्ष निष्ठेने राज ठाकरे यांच्या सोबत प्रतिकूल परिस्थितीतही टीकून राहीले. हे भाग्य गद्दार एकनाथास मिळू शकत नाही.
*राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यातील मतविभाजनाचा फायदा भाजपलाच झाला.मध्यंतरी भाजपने मनसेचा वापर शिवसेनेची मत विभाजनासाठी केला.त्याचा फटका ठाकरे बंधुंच्या दोन्ही सेनांना बसला व लबाड बोक्याला ( भाजपला ) सत्तेचे लोणी मिळाले. या भाऊबंदकीमुळे दोघांचे जितके नुकसान झाले नसेल त्यापेक्षा शतपटीने महाराष्ट्र व मराठी जनतेचे नुकसान झाले आहे.*
*आज उशीरा का होईना या ठाकरे बंधुंना साक्षात्कार झाला व ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर तो महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी सुवर्ण कांचन योग मानावा लागेल. राज व उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक ईगो बाजूला ठेऊन एकदिलाने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे हीच श्रींची इच्छा आहे.आई तुळजाभवानी तुम्हाला सुबुद्दी देवो.अखंड महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदूस्थानचे करोडो हिंदू या सुवर्ण पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहे.*
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०
लेखक हे ज्येष्ठ पत्रकार तसेच ज्येष्ठ शिवसैनिक असून त्यांचे गद्दारांना क्षमा नाही हा लेख संग्रह सुप्रसिद्ध आहे.