अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) मार्फत मा.तहसीलदार याना विविध मागण्यांचे निवेदन.
अमळनेर: विक्की जाधव.
अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांनी मा.रुपेशकुमार सुराणा तहसीलदार,अमळनेर द्वारा प्रति,मा.ना.श्री. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक नाराज आहेत. आपण पदभार घेतल्यापासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदाही स्वतंत्र बैठक घेतली नाही व समस्यांचे निराकरणही केले नाही. त्यामुळे सोमवार दि 17 मार्च 2025 रोजी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार /जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त यांना त्यांच्या कार्याल्यासमोर आंदोलन करून धरणे निवेदन देतील.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांबाबत शासनाने चर्चा करून गेल्या वर्षी दि 2/2/24 रोजी काही मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता. त्यानंतर मान्य मागण्यांमधील 1298 वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी सदर पदांवर कार्यरत केवळ 283 शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश दि 9/11/23 रोजी व 7/3/24 रोजी काढला व राज्यात काही शिक्षकांचे समावेशन करण्यात आले परंतु अनेक शिक्षकांचे समावेशन अजून झालेले नाही. काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.
आय टी शिक्षकांच्या समायोजनाचा शासनादेश, अंशतः अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे इत्यादी मान्य मागण्यांचे आदेश निघाले नाहीत. त्याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही अद्याप आपण चर्चाही केली नाही. त्यामुळे आमच्या तसेच सर्व शिक्षकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. महासंघ पुन्हा आंदोलन करीत आहे. मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
1) 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.
2) 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
3) राज्यातील अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी. जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्यात यावे
4) मान्यताप्राप्त आय टी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश त्वरित निर्गमित करण्यात यावा.
5) शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30 वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवडश्रेणीसाठीची 20 टक्क्यांची अट रद्द करावी.
6) प्रलंबित वाढीव पदांचे समायोजन त्वरित करावे.
7) विनाअनुदानित सेवेत असलेल्या शिक्षकांची अनुदानितकडे बदली करून त्यांच्या प्रस्तावास शिक्षण उपसंचालकांनी त्वरित मान्यता द्यावी.
8) संचालक कार्यालयात त्रुटी पूर्तता केलेल्या प्रलंबित वाढीव पदाच्या फाईल्स त्वरित मंत्रालयात मागवून त्या पदांना मान्यता देऊन त्यांच्या समयोजनाचे त्वरित आदेश द्यावेत.
9) सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात 21 विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये 31 विद्यार्थी ग्राह्य धरावेत.
10) एम.फिल..एम.एड., पीएच.डी. धारक क म वि शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतन वाढ लागू करावी.
11) निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे.
12) DCPS/NPS योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी. वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत.
13) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला, शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे.
14) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अंशकालीन घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे मानधन द्यावे.
15) कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
16) अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा.
17) अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करावी.
18) शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत.
19) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत.
20) शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करावा.
वरीत मागण्यांची पूर्तता करावी, समस्यांचे निराकरण करावे. अन्यथा यापुढे आंदोलन आम्हाला तीव्र करावे लागेल अशा आशयाचे पत्र अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेमार्फत मा. तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी प्राध्यापकांच्या सह्यांचे निवेदन पत्र देण्यात आले. निवेदन देताना ज्युक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिनेश बोरसे,सचिव- प्रा.स्वप्निल पवार, जिल्हा प्रतिनिधी-प्रा.जी. एल्. धनगर प्रसिद्धीप्रमुख- प्रा.किरण पाटील कार्यकारणी सदस्य- प्ना. प्रशांत ठाकुर,प्रा. सी.आर.पाटील, प्रा.विलास पाटील, प्रा.पंकज तायडे तसेच प्रा. डॉ. भरतसिंग पाटील, प्रा.वसंत पाटील,प्रा.बापू संदानशिव, प्रा.देवेंद्र वानखेडे प्रा.देवेंद्र तायडे प्रा.गुणवंत पाटील,प्रा.भालचंद्र शेलकर,प्रा.स्वप्निल भांडारकर व सर्व सन्माननीय प्राध्यापक वृंद उपस्थित होते.