सोलापूर : तुळजापूर जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात : ३ ठार तर १५ जखमी !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने सुरु असतांना आता सोलापुर जिल्ह्यात मोठा अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातात ३ जणांचा मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून तुळजापुरात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसला अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले आहेत. सध्या या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडी जवळ ट्रक, मिनीबस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने राँग साईडला जाऊन मिनी बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मिनी बस थेट पलटी झाली. यामुळे बसमध्ये असलेले प्रवाशी जखमी झाले. या मिनी बसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते.
या दुर्घटनेत बस चालकासह 3 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रॅक्टरच्या धुडाखाली दाबल्याने तरुण शेतकरी ठार
रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील अटवाडे येथील शेतकरी शेतातून तुर ट्रॉलीत भरून आणताना ट्रॅक्टर अचानक उलटले. यात ट्रॅक्टरच्या धुडाखाली दाबले जाऊन सुनील भिका कोळी (३९) या तरुण शेतकऱ्याचा जागीच अंत झाला. ही घटना अटवाडे शिवारातील शेतात रविवारी दुपारी दीड वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, किरण सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात मयताच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन डामरे पुढील तपास करीत आहेत. सुनील हा एकुलता मुलगा होता.
एकाच ठिकाणी सापडले ५० बेकायदेशीर सिलिंडर !
जळगाव : प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे गॅस विक्रीसाठी एकाच ठिकाणी तब्बल ५० भरलेल्या गॅस सिलिंडरसह तीन रिकामे सिलिंडर, मोटार व इतर साहित्यही एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत करण्यात आली. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीमध्ये घर क्रमांक ३५ येथे किरण भागवत पाटील (५१) याने बेकायदेशीर गॅस विक्रीसाठी सिलिंडरचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे गॅस विक्रीच्या उद्देशाने सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे आढळले. त्यात २९ व्यावसायिक, २१ घरगुती भरलेले असे एकूण ५० भरलेले सिलिंडर आढळन आले.
धरणगावात हाणामारी करणाऱ्या चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
धरणगाव : प्रतिनिधी
आपल्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसत असल्याच्या कारणामुळे प्रवाशाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोना मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास बसस्टॅन्डसमोर अतुल मधुकर वारडे (धानोरा) याची आई व बादल आकाश शिरसाठ (अशोक सम्राट नगर उधना सुरत) असे संदीप संजय कंखरे (धरणगाव) यांच्या गाडीत बसले होते. मात्र, दुसरी गाडी निघत असल्याने अतुल वारडे याची आई व बादल शिरसाठ हे दोन्ही दुसऱ्या गाडीत बसले. त्यामुळे संदीप संजय कंखरे याने अतुल वारडे याच्या आईला शिवीगाळ केली.
दरम्यान, तेथे असलेले धरणगाव पोलिस स्टेशनचे पोना मिलींद अशोक भामरे हे संदीपला बोलण्यास गेले असत त्याने त्यांना देखील शिवीगाळ केली त्यामुळे संदीपला धक्का लागल्याने त्याचा तोल गेला आणि तो तोंडावन पडल्याने त्याचे दात तुटून तो जखम झाला. यावेळी स्वप्नील उर्फ सोनू पाडुरंग धनगर (धरणगाव) याने बादल शिरसाट याला दगड मारून जखमी केले. त्यामुळे बादल शिरसाठ हाही या घटनेत जखम झाला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनचे पोना मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोहेकों चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.
जळगावात गौमांस कत्तल-विक्री करणाऱ्या तिघाना ठोकल्या बेड्या !
जळगाव | १० फेब्रुवारी २०२५
शहरात अवैध गौमांस व्यापार आणि कत्तलीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. मास्टर कॉलनी परिसरात रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ही धडक कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी तब्बल १५० किलो गौमांस जप्त केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने मास्टर कॉलनी भागात छापा टाकला. उमर मस्जिदजवळील एका घरात तसेच एका रिक्षामध्ये अवैधरीत्या गौमांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक किशोर पाटील, पोशि गणेश ठाकरे, छगन तायडे, किरण पाटील आणि योगेश घुगे यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली.
छाप्यादरम्यान आरोपी युसूफ खान समशेर खान (वय ५०, रिक्षाचालक, रा. तांबापुरा, जळगाव) हा त्याच्या रिक्षामध्ये १०० किलो गौमांस घेऊन जात असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गौमांस शेख शकील शेख चाँद (वय ३८, राहणार मास्टर कॉलनी, जळगाव) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी शेख शकील शेख चाँदच्या घराची झडती घेतली असता, त्याचा साथीदार आसीफ खान लतीफ खान (वय ३०, इस्लामपुरा, शनिपेठ, जळगाव) याच्या मदतीने तो घरातच गोवंश कत्तल करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या घरातून ५० किलो गौमांस, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कुऱ्हाड, सुरा यांसारख्या धारदार हत्यारांसह दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार मनपा कर्मचारी जागीच ठार
जळगाव १० फेब्रुवारी २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना दि.९ रोजी रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड येथील बस स्थानकाजवळ महामार्गावर भरधाव ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असेकी, वराड बु गावा जवळील महामार्गावरील बस स्थानकानजीक जळगावकडून एरंडोलकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी. आर ९९९९ ने मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ डी. ३७२६ ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार विनोद वसंत कोळी (वय ४८) रा. जवखेडे (हिगोणे) ता. एरंडोल यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मयत विनोद कोळी हे जळगाव महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी असून ते रविवारी ड्यूटीकरून काही खासगी कामांसाठी गेले तेथून ते गावी घरी परत जात असतांना त्यांना ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच वराड येथील महिला पुरुषांनी घटनास्थळी घाव घेतली. यावेळी वराड ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून मयताचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रवाना केला होता. यासाठी बापू महाजन, सचिन महाजन, विनोद पाटील, प्रशांत पाटील, गावातील पोलीस पाटील व वराड ग्रामस्थांनी मदत कार्य केले.
जळगावातील महिलेच्या खात्यातून काढले परस्पर २६ लाख !
जळगाव : प्रतिनिधी
वडिलांच्या निधनानंतर वारस म्हणून बँक खात्याचा हक्क घेतलेल्या संयोजिता मुदीत नागपाल (रा. मुंबई) या आयकर विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जळगावातील बँक खात्यातून परस्पर २६ लाख रुपये काढून घेण्यात आले. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी घडलेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी याविषयी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असेकी, जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील स्टार कुलर कंपनीचे संचालक प्रमोद गजानन चुरी यांचे काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेमध्ये खाते होते. त्यांचे १५ जानेवारी २०२३ रोजी व त्यांच्या पत्न कल्पलता चुरी यांचे ३ मार्च २०२३ रोजी निधन झाले. प्रमोद चुरी यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाल्याने सदर बँक खात्याच्या वारस म्हणून मुलगी संयोजिता नागपाल यांनी हक्क मिळविला. त्या वेळी बँक खात्यात एक कोटी ४६ लाख ९२ हजार ८८२ रुपये होते. मुंबई येथे आयकर आयुक्त कार्यालयात नोकरीला असलेल्या संयोजिता यांनी या खात्यातून एक कोटी २२ लाख ४३ हजार ६७ रुपये काढून घेतले. काही दिवसांनी मुलीने बँक खाते तपासले असता त्यात ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शिरपूर शाखेतून प्रमोद चुरी यांच्या नावाने २०० रुपये जमा करण्यात आल्याचे दिसले. मात्र चुरी यांचे त्यापूर्वीच निधन झालेले असतानाही त्यांच्या नावाने ही रक्कम जमा झाली आहे. याच्या १० दिवसांनंतर लगेच २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर बँक खात्यातून गौरव सुनील तिवारी यांच्या नावे २६ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे बँक स्टेटमेंट दिसून आले.
सदर महिला मुंबई येथे राहत असल्याने त्यांनी हा प्रकार स्टार कुलर कंपनीमध्ये प्रमोद चुरी यांच्यासोबत संचालक असलेले व त्यांचे मित्र सुशीलकुमार असोपा यांना कळविला. तसेच याविषयी पोलिसांकडे तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार असोपा यांनी ८ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.
अपघातात गंभीर जखमी लिपिकाचा दुर्देवी मृत्यू
अमळनेर : प्रतिनिधी
अपघातात गंभीर जखमी झालेले नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील यांनी मृत्यूशी झुंज देत दि.८ रोजी अखेरचा श्वास घेतला. वरिष्ठ लिपिक विजय अभिमन पाटील (रा. पारगाव, ह. मु. देशमुख बंगला जवळ, अमळनेर) यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यानंतर रुग्णालयात मृत्यूशी ते झुंज देत होते, मात्र दुर्देवाने मेंदूला मोठा मार असल्याने दि.८ रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पालिकेतून तीन महिन्यात ते निवृत्त होणार होते. त्यापूर्वीच काळाने घात केल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले. अत्यंत शांत व सुस्वभावी
व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती, या घटनेने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा सून व नातवंडे असा परिवार असून चेतन उर्फ विक्की विजय पाटील यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते कैलास नामदेव पाटील व पालिका कर्मचारी बंडु पाटील यांचे ते मेहुणे होत.
जळगावात पुन्हा आढळले एकाच ठिकाणी ५० गॅस सिलिंडर आढळले !
जळगाव | १० फेब्रुवारी २०२५
जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यापूर्वी बेकायदेशीररित्या गॅस पंप सुरु होता याठिकाणी झालेल्या स्फोटात तब्बल ६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यानंतर जळगाव शहरातील पोलीस खळबळून जागे झाले. त्यानंतर शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेले बेकायदेशीररित्या गॅस पंप बंद करण्यात आले मात्र तरी देखील बेकायदेशीररित्या गॅस विक्रीसाठी एकाच ठिकाणी तब्बल ५० भरलेल्या गॅस सिलिंडरसह तीन रिकामे सिलिंडर, मोटार व इतर साहित्यही आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी ते जप्त केले आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत करण्यात आली. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीमध्ये घर क्रमांक ३५ येथे किरण भागवत पाटील (५१) याने बेकायदेशीर गॅस विक्रीसाठी सिलिंडरचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे गॅस विक्रीच्या उद्देशाने सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे आढळले.
त्यात २९ व्यावसायिक, २१ घरगुती भरलेले असे एकूण ५० भरलेले सिलिंडर आढळून आले. तसेच तीन रिकामे सिलिंडरही येथे होते. या सिलिंडरसह पोलिसांनी प्रेशर मोटर, चार फुटाचे पाईप, लोखंडी सॉकेट, इलेक्ट्रॉनिक पंप, वजन काटा असा एकूण एक लाख ६४ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी पोकॉ योगेश घुगे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.