गॅस लीक संभाजीनगरची हवा गुणवत्ता गंभीर टप्प्यावर, आरोग्य यंत्रणा हायअलर्ट वर
प्रतिनिधी.शेखर सिरसाठ छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या डीव्हायडरला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. त्यामुळे गॅस लिकेज झाला असून परिसरातील १ किलोमिटर पर्यंत नाकाबंदी करण्यात आली आहे. आता प्रदूषण नियंत्रक मंडळाने केलेल्या तपासणीत हवेची गुणवत्ता गंभीर स्वरूपाच्या पातळीवर पोहचली आहे. साधारणतः २० इतकी असणारी गुणवत्ता सध्या ४००वर पोहचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर गुणवत्ता पातळीमुळे नागरिकांना श्वासासंबंधी त्रास होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मनपाचे डॉक्टरांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.