सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची कामगिरी…
ऑनलाइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा होईल असे सांगून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला भावनगर गुजरात येथून सायबर पोलीस स्टेशन जळगाव यांनी केली अटक…
जळगाव दि. २९/०५/२०२३
ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मोठया प्रमाणावर नफा होईल असे सांगुन ऑनलाईन फसवणुक करणारा भावनगर, गुजरात येथुन सायबर पो.स्टे. जळगाव कडुन गजाआड
सदर गुन्हयातील फिर्यादी हे रावेर येथील रहिवाशी असुन त्यांची दि. १४ / १२ / २०२२ पासुन ते दि.०१/०४/२०२३ चे दरम्यान ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास डबल नफा होईल असे सांगुन फिर्यादी यांचेकडुन वेळोवेळी पैशांची मागणी करुन त्यांना ट्रेडिंग अॅप्लीकेशनमध्ये डिजीटली पैसे डबल इ आलेले दाखवुन त्यांचेकडुन वेळोवेळी ९,३०,०००/- रुपये स्वीकारून त्यांची फसवणुक केली होती. त्याबाबत त्यांनी सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे येवून त्यांचे सोबत झाले प्रकाराची हकीकत कथन केली असता सायबर पोलीस स्टेशन जळगांव येथे त्यांचे फिर्यादी वरुन भाग-५ गुरनं. १२/ २०२३ भादवि क. ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ( डि) प्रमाणे फिर्यादी यांची ९,३०,०००/- रुपयांना फसवणुक केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी व त्यांचे अधिनस्त सायबर पो.स्टे. चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तपासाचे अनुषंगाने फिर्यादी यांना आलेले व्हॉट्सअॅप मॅसेज, व्हॉट्सअॅप कॉल, फिर्यादी यांनी जे ऑनलाईन ट्रेडिंग अॅप्लीकेशन इंन्स्टॉल केले होते त्याचे तांत्रिक विश्लेषन व फिर्यादी यांनी ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले आहे. अशा सर्व प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषन करुन आरोपी हे गुजरात राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांचे आदेशाने सदर गुन्हयातील आरोपी अटक करणेकामी व तपासकामी गुजरात राज्यातील भावनगर येथे पोउपनि दिगंबर थोरात यांचे सोबत पोहेकॉ प्रविण वाघ, पोना दिलीप चिंचोले, पोकॉ गौरव पाटील असे तपास पथक रवाना झाले होते.
सदर गुन्हयातील आरोपी १) विजय दयाभाई कलसरीया ऊर्फ अजय, वय ३३, व्यवसाय- खाजगी नोकरी, रा. अम्रेली गुजरात अशा आरोपीस अटक करुन त्यांचेकडुन फसवणुक रकमेपैकी ५,००,०००/- रुपये, ATM Card, Mobile असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तांत्रिक कामकाज हे सायबर पो.स्टे. येथील पोउपनि दिगंबर थोरात, पोना / दिलीप चिंचोले व पोकों / गौरव पाटील, पोहेकॉ / संदिप साळवे, पोकॉ/ ईश्वर पाटील यांनी केले होते.
नागरीकांना जाहीर आवाहन
तरी याव्दारे सायबर पोलीस स्टेशन जळगाव कडून जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणुक करतांना त्या अॅप्लीकेशनची सविस्तर खात्री करावी. ऑनलाईन ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करतांना आपले संपर्क (Contact) यादी, गॅलरी, टेक्स्ट मेसेज याची परवानगी देवु नये जेणेकरून फसवणुक होणार नाही. तसेच कुठल्याही अनोळखी व्यक्ती वा अॅपव्दारे ऑनलाईन व्यवहार करणे टाळावेत व ऑनलाईन व्यवहारांचे पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवावेत. तसेच कोणी हि अनोळखी व्यक्तींना स्वता: चे नावे बँक खाते तयार करुन देवु नये.