समर्थकावर गुन्हा दाखल केल्यामुळे आ. दटके यांची पोलीसांना दमदाटी
मारहाण व विनयभंगाच्या प्रकरणात गणेशपेठ येथे गुन्हा दाखल
नागपूर – कार पार्किंगच्या विषयावर सुरू झालेल्या विवादावरून आरोपी दिलीप दिवटे यांनी ५४ वर्षीय फिर्यादी महिलेच्या मुलाला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. २५ मे रोजी घडलेल्या घटनेत फिर्यादीचा मुलगा हा कार पार्किंगमधून काढत असतांना रस्त्यावर असलेला लोखंडी बेंच त्याने हटवला. बेंच का हटवला ? या मुद्द्याला धरून आरोपी दिवटे यांनी सुरू केलेल्या या शाब्दिक बाचाबाची मोठ्या भांडणाच्या स्वरूपात झाली .आरोपी दिलीप दिवटे आणि सहआरोपी प्रमोद दिवटे आणि कुणाल गायधने हे सुद्धा या प्रकरणात सामील असून, घडलेल्या प्रकरणात दिवटे यांनी केलेल्या अश्लील शिवीगाळ आणि मारहाणीनंतर महाल येथे गेलेली मुलाची आई आणि वडील माहिती मिळाल्यावर घटना स्थळी दाखल झाले. त्याच वेळेला तेथे सह आरोपी आणि मुख्य आरोपीचा मोठा भाऊ प्रमोद दिवटे दुचाकी घेवून तेथे आला. मुलाच्या वडिलांने मुलाला केलेल्या शिवीगाळ याबाबत विचारणा केली असता संतापलेल्या प्रमोद याने फिर्यादी महिलेच्या पतीला सुद्धा शिवीगाळ करून हाताबुक्कीने मारहाण करायला सुरुवात केली करून त्यांचा चश्मा सुद्धा तोडला. या वेळी पतीच्या बचावासाठी भांडण सोडवायला गेलेल्या महिलेचा गळा दाबत तिला छातीला धरून आरोपीने बाजूला केले व स्त्रीला लज्जा वाटेल अशा शब्दांत शिवीगाळ सुरू केली एवढेच नाही तर पुढे आरोपीच्या मोठ्या भावाने मागून दुचाकी आणत फिर्यादी महिलेच्या पायावर गाडी चढवली. ज्यामुळे महिला तोंडावर खाली पडली महिलेला मार लागून फ्रॅक्चर झाले. व मुलाला टाके सुध्दा लागले. वाढलेल्या भांडणात कुणाल हा सुद्धा शिवीगाळ करीत आला व मारहाण केली. या भांडणात आरोपीने फिर्यादीला जीवाने मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गणेशपेठ पोलीसांनी चौकशी करून पुराव्याचे आधारे कलम 324 , 326 , 354 , 294 , 506 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला , परंतु 307 चा गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. समर्थकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे संतापलेले आमदार प्रवीण दटके हे आपल्या अनेक समर्थकांसह शनिवारी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे हजर झाले. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणून पोलीसांना दमदाटी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एका संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता पीडित महिले विरूध्द जावून गुन्हेगारांची पाठराखण करणे हे अत्यंत निंदनीय आहे. पोलीसांना त्यांचेवरच कारवाई करण्याची धमकी दिल्याने अनेक पोलीस कर्मचारी दडपणात आहेत. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले श्री. देवेंद्र फडणवीस हे महिला विरोधी असलेल्या आमदाराचे कान टोचतील की , संरक्षण देतील हे बघावे लागेल असा प्रश्न या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांनी उपस्थित केला आहे. रेवतकर यांनी आमदार प्रवीण दटके यांच्यावर आरोपीला वाचविण्यासाठी तसेच सरकारी कामात अडथळा आणून पोलीसांवर दबाव टाकण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. तसेच त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर फिर्यादी व इतर महिलांसह आंदोलनाची तयारी सुद्धा दर्शवली आहे.