२ जून रोजी शिरपूरात महाराणांच्या ऐतिहासिक शौर्यगाथेस उजाळा
शिरपूर प्रतिनिधी: विक्रम संवत नुसार ‘राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह’ यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा आणि सुप्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि राष्ट्रीय वक्ते जयपालसिंह गिरासे यांचे ‘हल्दीघाटी व दिवेर युद्धाची रोमहर्षक शौर्यगाथा’ या ऐतिहासिक विषयावर प्रकट व्याख्यान आमोदा ता. शिरपूर येथील महाराणा प्रतापसिंह मैदानावर आयोजित केलेले आहे. अशी माहिती राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने केलेले आहे. सकाळी आमोदा येथील महाराणा प्रतापसिंह पुतळ्यासमोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत घोष वंदना सादर केली जाईल तथा आमोदा गावातून संचालन केले जाईल. शिरपूर शहरातील विविध राष्ट्रपुरुषांच्या फलकांचे पूजन करण्यात येईल तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरून मोटार सायकल रैली काढण्यात येईल.
सायंकाळी ४ वाजता क्रांतीनगर ते आमोदा येथील मैदान अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येईल. शोभायात्रेचा समारोप आमोदा येथील महाराणा प्रतापसिंह मैदानावर होईल. त्या ठिकाणी सुप्रसिद्ध इतिहासकार,वक्ते व लेखक श्री जयपालसिंह गिरासे यांचे प्रकट व्याख्यान संपन्न होईल. श्री गिरासे यांनी आजपावेतो विविध ऐतिहासिक विषयांवर देशातील ९ राज्यांमधे सहाशे पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली असून चार भाषांमध्ये त्यांनी लिहिलेले सहा ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. त्यापैकी दोन ग्रंथ हे केवळ महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनावर लिहिलेले आहेत. येत्या काळात अजून तीन ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
कार्यक्रमासाठी मराठी विनोदी टीव्ही सिरिअल ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ चे कलाकार शाम राजपूत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तालुक्यातील समस्त राजपूत समाजातील बांधवांनी जास्तीस जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान महाराणा प्रतापसिंह उत्सव समितीने केले आहे.