करमाळा प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करमाळा शिवसेना महिला आघाडीने दि. १३ मार्च २०२२ रोजी गुणगौरव अस्मितेचा – गुणगौरवक केलेचा – खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शन व स्पर्धेचे आयोजन किल्ला विभाग, जुन्या कोर्टासमोर, करमाळा येथे केले होते. या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जवळपास 837 महिलांनी सहभाग नोंदविला.
यावेळी शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मागील २ वर्षांपूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोविड १९ ची सुरुवात झाल्याने व महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोविड कालावधीत कोणतेही गर्दी होणारे कार्यक्रम घेऊ नये असे आदेशित केल्याने त्यावेळी सर्व कार्यक्रम तहकूब केले होते. परंतु आता कोविड चा धोका कमी झाल्याने पुन्हा महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करमाळा शिवसेना माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख आशा टोणपे ह्या होत्या.
या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेत्या होणाऱ्या महिलेस सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच शेवट पर्यंत उपस्थित राहणाऱ्या महिलांमधून ७ लकी ड्रॉ काढण्यात आल्या त्यामध्ये पैठणी, डिझायनर साडी, सोन्याची नथ, मिक्सर, फॅन, आर्टिफिशिअल ज्वेलरी इ. भरगोस बक्षिसाचे वाटप महिलांना करण्यात आली. तसेच किल्ला विभागात उल्लेखनीय कार्य केलेल्या पुरुषांना व महिलांना यावेळी किल्ला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायकवाड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सोलापूर शिवसेना महिला संपर्क प्रमुख तथा शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत महाराष्ट्रातील राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी या सर्व रणरागिणीची भूमिका सादर केली तसेच भारतातील सर्व राज्यतील विविधतेचे दर्शन म्हणून वेगवेगळी वेशभूषा धारण करून उपस्थित महिलांची मने जिंकली. सदरच्या कार्यक्रमासाठी नगरसेविका संगिता खाटेर, यश कल्याणी परिवाराचे गणेश करे पाटील, दर्शन चंकेश्वरा, अल्लाउद्दीन शेख, शरद शहाणे, सुधीर आवटे व महेश चिवटे यांनी सहकार्य केले.
यावेळी किल्ला विभाग रणरागिणी ग्रुपच्या वतीने प्रियांका गायकवाड यांचा तुळशी हार घालून यथोचित सन्मान केला व गायकवाड ह्या महिलांसाठी राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना शहरप्रमुख विशाल गायकवाड, उपशहर प्रमुख अविनाश भिसे, प्रसाद निंबाळकर, यांचेसह शिवकन्या सुरक्षा समितीच्या सर्व सदस्यांनी अपार मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.
