पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न
किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय व देशभक्त फकीरा आप्पा नामदेव देवरे कनिष्ठ महाविद्यालय, बोराडी येथे आज पालक-शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. शशांक जी. रंधे उपस्थित होते तर प्रमुख मान्यवर म्हणुन पालक संघांचे अध्यक्ष श्री. वासुदेव सत्तेसा तसेच अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चित्रा वैद्य मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. संदीप सी. चौधरी यांनी केले. त्यांनी शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्याचे महत्त्व तसेच शाळेच्या गतवर्षीच्या यशस्वी वाटचालीचा आढावा मांडला. विद्यार्थ्यांची उपस्थिती, अभ्यास, परीक्षा निकाल, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम यांची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री. शशांक जी. रंधे यांनी पालक व शिक्षकांशी संवाद साधत बदलत्या काळातील विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक व शैक्षणिक गरजा, किशोरवयातील बदल, योग्य मार्गदर्शन, मोबाईलचा सुयोग्य वापर, करिअर नियोजन तसेच पालकांनी मुलांशी जिव्हाळ्याचा संवाद कसा ठेवावा याविषयी समुपदेशन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध प्रश्नांवर त्यांनी मार्गदर्शन करून पालकांच्या शंकांचे समाधान केले.
यावेळी पालक प्रतिनिधींनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या कार्याचे कौतुक केले व शिक्षक-पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर मुक्त संवाद व प्रश्नोत्तर सत्रात पालकांनी विविध प्रश्न मांडले. शिक्षक व प्रमुख पाहुण्यांनी त्यांना समाधानकारक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एम. वायकोडे यांनी केले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पालक-शिक्षक मेळावा यशस्वीरीत्या संपन्न झाला.