पुणे ग्रामीणमध्ये ड्रोन उड्डाणावर निर्बंध; चित्रीकरणासाठी ७ दिवस आधी पोलिसांची परवानगी बंधनकारक
पुणे, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे होणाऱ्या अनधिकृत चित्रीकरणावर आळा घालण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, कोणत्याही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था किंवा छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोनचा वापर करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला किमान ७ दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे तसेच विविध केंद्रीय संस्थांचा समावेश आहे. ड्रोनचा वापर करून टेहळणी केल्यानंतर त्याचा गैरवापर दहशतवादी किंवा अतिरेकी कारवायांसाठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून टेहळणीसाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या साधनांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण करताना कोणीही आढळल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे.