जि. प. प्राथमिक शाळा डिकसळ येथे ग्रंथदिंडी व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न
(निलेश गायकवाड)
Bhigwan , ता. इंदापूर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जि. प. प्राथमिक शाळा, डिकसळ येथे मंगळवार, दि. २२ जुलै रोजी ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि अभंगांच्या सुरेल स्वरांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मा. सौ. मनीषाताई गवळी यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून ग्रंथदिंडी व पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. टाळ, चिपळ्या, भगवे पताके आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर करीत पालखी गावातून मार्गक्रमण करत योगेश्वरी मंदिरात पोहोचली.
योगेश्वरी मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी अभंग, हरिपाठ, गवळणी आणि भजनांचे सादरीकरण करून उपस्थितांना वारकरी संप्रदायातील भक्ती, संस्कार आणि समतेचा संदेश दिला. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले. अभंगांच्या लयीत विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ पारंपरिक फुगड्यांच्या फेरात रंगून गेले. भक्ती, संस्कृती, वाचनसंस्कार आणि वारकरी परंपरेचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याची गोडी, वाचनाची आवड, संस्कारमूल्ये आणि समाजातील ऐक्य, प्रेम व सेवाभाव रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
समारोपप्रसंगी ग्रामपंचायत डिकसळ यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. सतीश दराडे, शिक्षिका सौ. सुवर्ण खरात, माजी उपसरपंच सौ. ज्ञानेश्वरी कुंभार, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक श्री. सतीश (नाना) काळे, श्री. रावसाहेब गवळी, श्री. संदीप पाटील, श्री. सुनील काळे, श्री. दत्तात्रेय पवार तसेच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तिरस, वाचनसंस्कार आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम घडविणारा हा ग्रंथदिंडी व पालखी सोहळा ग्रामस्थांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.