गरोदर, स्तनदा माता व चिमुकल्यांसाठी सर्वसमावेशक सुविधा – महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-10 at 10.52.42 AM

गरोदर, स्तनदा माता व चिमुकल्यांसाठी सर्वसमावेशक सुविधा – महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील ठाकरे

(निलेश गायकवाड)

पुणे दि. ९ : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत गरोदर माता, स्तनदा माता आणि दोन वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सोयीसाठी जिल्ह्यात एकूण ५७ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आले आहेत. वारकरी मातांना प्रवासादरम्यान सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ७ बालविकास प्रकल्प अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि १९८ अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती करण्यात आली असून पालखी मार्गावरील प्रत्येक हिरकणी कक्षात प्रशिक्षित कर्मचारी सेवा देत आहेत.

हिरकणी कक्षांमध्ये दोन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी ‘बाळकृष्ण कोपरा’ तयार करण्यात आला असून त्यामध्ये राजगिरा, शेंगदाणे, मुरमुरे लाडू, फुटाणे, फळे, बिस्किटे, ओआरएस, ग्लुकोन-डी, तसेच खाऊ साठविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी आणि मानसिक विकासासाठी बॅट-बॉल, खुळखुळा, बाहुली, मोठे व छोटे चेंडू तसेच विविध खेळण्यांचा संच उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गरोदर व स्तनदा मातांना विश्रांतीसाठी स्वच्छ आणि अल्हाददायक वातावरण निर्माण करण्यात आले असून बेड, गाद्या, बेडशीट, उश्या, पार्टिशनसाठी पडदे, नॅपकिन, प्रथमोपचार पेटी, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्लास तसेच सॅनिटरी पॅड यांसारख्या आवश्यक सुविधा प्रत्येक हिरकणी कक्षात उपलब्ध आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांना मातृत्वाच्या काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, बालकांचे आरोग्य अबाधित राहावे आणि त्यांना सन्मानपूर्वक सुविधा मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. “वारकरी परंपरेचा सन्मान करताना मातृत्वाचा सन्मान जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ गरोदर व स्तनदा माता तसेच लहान बालकांच्या पालकांनी घ्यावा,” असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील ठाकरे यांनी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम पालखी सोहळ्यातील महिला व बालकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाला प्राधान्य देणारा एक संवेदनशील आणि लोकाभिमुख उपक्रम ठरत असून वारकरी संप्रदायातून त्याचे स्वागत होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!