पुरा पेक्षा मोठा धोका आजारांचा,दोंडाईच्यात आता स्वयम् घोषीत समाजसेवकांची खरी परीक्षा..
दोंडाईचा शहरात यंदाचा पाऊसाळा चांगलाच रंगात आला आहे. चार-पाच वजनदार-दमदार सरींनी अमरावती-भोगावती नदीला पूर आला असून नदीपात्रातून सलग पाणी वाहत आहे. शेतकरी-व्यापारी-व्यवसायीक-सर्वसामान्य नागरीकांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी दुसऱ्या बाजूला आरोग्याच्या धोक्याची घंटाही वाजू लागली आहे. हवामानातील अचानक बदल, गढूळ व दूषीत पाणी, साचलेले पाणी, वाढणारे डास आणि अस्वच्छ परीसर यामुळे सर्दी, खोकला, ताप, अतिसार, व्हायरल संसर्ग आणि इतर साथीच्या आजारांची चाहूल लागणे ही दरवर्षीची वस्तुस्थिती आहे.
प्रश्न एवढाच आहे की, या संकटाची चाहूल लागण्याआधी आपण जागे होणार की रुग्णालयांच्या दारात रांगा लागल्यानंतर?
आज शहरात समाजसेवा करणाऱ्या पायलीच्या पंधरा संस्था, मंडळे, प्रतिष्ठाने, नगरसेवक, माजी-विद्यमान लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांची संख्या कमी नाही.वर्षभर विविध सामाजीक उपक्रम, वाढदिवस, सत्कार, रक्तदान, पुरस्कार, पदग्रहण, बॅनरबाजी आणि प्रसिद्धी यामध्ये समाजसेवेचा गजर ऐकू येतो. पण पाऊसाळ्यात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दारात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जनजागृती घेऊन किती जण पोहोचतात, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. समाजसेवा म्हणजे केवळ पुष्पगुच्छ स्वीकारणे नव्हे, तर तापाने फणफणणाऱ्या मुलाच्या कपाळावर वेळेवर औषध ठेवणे होय. समाजसेवा म्हणजे भाषण नव्हे, तर गरीब रुग्णाला डॉक्टर मिळवून देणे होय. समाजसेवा म्हणजे प्रसिद्धी नव्हे, तर संकट येण्यापूर्वी त्याला अडविणे होय.
शहरातील अनेक सक्षम नागरीकांकडे आरोग्य विमा आहे. मोठ्या रुग्णालयात उपचार घेण्याची त्यांची आर्थिक क्षमता आहे. परंतु रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबांसाठी दोन दिवसांचा तापसुद्धा घरातील चूल विझवू शकतो. औषधांच्या खर्चापेक्षा त्या दिवसाची बंद पडलेली मजुरी त्यांच्यासाठी अधिक वेदनादायी असते. म्हणूनच प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक प्रभावी हा विचार प्रत्यक्षात उतरविण्याची वेळ आली आहे.
दोंडाईच्यातील प्रत्येक प्रभाग, झोपडपट्टी, गरीब वस्ती आणि मध्यमवर्गीय भागात मोफत आरोग्य तपासणी शिबीरे, प्राथमीक उपचार केंद्रे, आवश्यक औषधांचे वितरण, पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती, डास नियंत्रण आणि स्वच्छता मोहीमा तातडीने सुरू झाल्या पाहीजेत. शासनाच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधून हा उपक्रम सहज राबविता येऊ शकतो. त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची नाही, तर संवेदनशील मनाची गरज आहे. पूराचे पाणी काही दिवसांनी ओसरेल, पण रोगराईचा पूर जर घराघरांत शिरला, तर त्याचे परीणाम अनेक महिने भोगावे लागतील. नदीचा पूर डोळ्यांना दिसतो, पण निष्काळजीपणाचा पूर समाजाला आतून पोखरतो. म्हणूनच आज घेतलेली दक्षता उद्याचे शेकडो रुग्ण कमी करू शकते.
आज दोंडाईच्यातील प्रत्येक समाजसेवेचा दावा करणाऱ्या संस्था, लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन मोफत आरोग्य शिबीरे, तपासणी केंद्रे आणि जनजागृती अभियान लोकांच्या दारात सुरू करण्याची सुवर्णसंधी उभी आहे. जनतेच्या टाळ्या मिळविण्यापेक्षा जनतेचे आरोग्य वाचविणे अधिक मोठे आहे. कारण निवडणुकीत दिलेले आश्वासन लोक काही वर्षांनी विसरतात, पण संकटाच्या काळात हाताला धरून उभे करणारा माणूस आयुष्यभर लक्षात राहतो.
शेवटी एकच प्रश्न स्वयम् घोषीत समाजसेवकांना विचारावासा वाटतो, एक रूपया खर्च न होता पद मिळवली आहेत.त्यात पाऊसाळा सुरू झाला आहे, आता फोटो काढण्याचा नव्हे,तर लोकांचे आरोग्य जपण्याचा ऋतू सुरू झाला आहे.आज उचलेले एक पाऊल उद्या अनेक कुंटूबांना औषधेऐवजी निरोगी आयुष्याची भेट देऊ शकते.मग समाजसेवा बॅनरवर दिसणार की दवाखान्याच्या दारात? कारण इतिहास नेहमी भाषणे लक्षात ठेवत नाही, तो संकटाच्या वेळी पुढे सरसावलेल्या हातांची नोंद ठेवतो. दोंडाईचा आज अशाच हातांची वाट पाहत आहे.