भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी! CEIR पोर्टलच्या मदतीने 2.5 लाखांचे 10 हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले
(निलेश गायकवाड)
भिगवण : भिगवण पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सन 2025 व 2026 या कालावधीत शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाचे हरवलेले तब्बल 10 महागडे मोबाईल फोन भिगवण पोलिसांनी CEIR पोर्टलच्या साहाय्याने शोधून काढले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 2,50,000 रुपये इतकी आहे.
भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ शेंडगे यांनी नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल परत मिळावेत यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार तुषार रायकर यांना मार्गदर्शन करून गहाळ मोबाईलची माहिती संकलित करून शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस अंमलदार तुषार रायकर यांनी CEIR पोर्टलच्या मदतीने 10 मोबाईलचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आणि मूळ मालकांना सन्मानाने परत केला. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी भिगवण पोलिसांचे आभार मानले आहेत.
ही संपूर्ण कामगिरी मा. संदीप सिंह गिल्ल सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा. चैतन्य कदम सो, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे व पोलीस अंमलदार तुषार रायकर यांनी पार पाडली आहे.