मठगव्हाण ग्रामपंचायतीला मोठा दणका! एकाच दिवशी तीन सदस्य अपात्र..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261120-WA0011

मठगव्हाण ग्रामपंचायतीला मोठा दणका! एकाच दिवशी तीन सदस्य अपात्र..

 

अमळनेर : विक्की जाधव.

मठगव्हाण ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांना एकाच दिवशी अपात्र ठरविण्यात आल्याने ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी दोन सदस्य, तर ग्रामपंचायत कर विहित मुदतीत न भरल्याप्रकरणी एका सदस्या अशा एकूण तीन सदस्यांना अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी तीन स्वतंत्र आदेशांद्वारे अपात्र घोषित केले.

दिपक सुभाष पाटील व रविंद्र गोरख पाटील यांना शासकीय जागेवरील अतिक्रमणामुळे, तर अल्काबाई दगाजी पाटील यांना कर थकबाकीच्या कारणावरून अपात्र ठरविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या रेखाबाई शिवाजी भिल यांनी दाखल केलेल्या तीन विवाद अर्जांवर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदारांतर्फे अॅड. वसंत एस. भोलाणकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

दिपक सुभाष पाटील यांच्या प्रकरणात मालमत्ता क्र. ९२/१ च्या मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम करून शासकीय रस्ता व सार्वजनिक जागेवर २४४.८० चौ. फूट अतिक्रमण केल्याचे मोजणी अहवालातून निष्पन्न झाले. भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी व संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालांच्या आधारे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाचा निष्कर्ष नोंदविला.

दुसऱ्या प्रकरणात रविंद्र गोरख पाटील यांच्या मालमत्ता क्र. २४ बाबतही मंजूर क्षेत्रापेक्षा अधिक बांधकाम केल्याचे आढळले. प्रत्यक्ष मोजणीनुसार सुमारे ४३८ चौ. फूट सार्वजनिक व शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४(१)(ज-३) अंतर्गत सदस्य अपात्रतेची कारवाई करण्यात आली.

कर थकबाकीमुळे अल्काबाई पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई

अल्काबाई दगाजी पाटील यांनी सन २०२५-२६ मधील ग्रामपंचायत कर विहित मुदतीत भरला नसल्याचा विवाद अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीने २३ सप्टेंबर २०२५ रोजी कराची मागणी केली असताना, संबंधित कराचा भरणा २२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आला. त्यामुळे निर्धारित तीन महिन्यांच्या मुदतीनंतर कर भरल्याचे नोंदविण्यात आले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १४(ह) अन्वये कराची मागणी झाल्यानंतर विहित तीन महिन्यांत कर न भरल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. या तरतुदीनुसार अल्काबाई पाटील यांना विद्यमान ग्रामपंचायत कालावधीपुरते अपात्र घोषित करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!