अमळनेर पुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात युवासेना आक्रमक!
पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाण शेख यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची तहसीलदारांकडे मागणी
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर शहरातील पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुरवठा निरीक्षण अधिकारी आर. जे. शेख यांच्या कार्यपद्धतीची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, अमळनेर यांना निवेदन देऊन करण्यात आली.
या निवेदनात पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. विशिष्ट धर्मातील अपात्र व्यक्तींना प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेचा लाभ दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरणे, खोट्या तक्रारींवर कारवाई करण्याच्या धमक्या देणे, शासकीय कामकाजात अनावश्यक विलंब करणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तसेच आर्थिक मागणी होत असल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासकीय कार्यालयातील कामकाज पारदर्शक आणि लोकाभिमुख असणे अपेक्षित असताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे
सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ कोणताही भेदभाव न करता पारदर्शक पद्धतीने मिळावा, अशी मागणी युवासेनेने केली आहे. या प्रकरणात योग्य ती कार्यवाही न झाल्यास युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी जळगाव तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवसेनेचे प्रवीण पुरुषोत्तम पाटील – युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज संतोष शेटे विधानसभा क्षेत्रप्रमुख व असख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते