करमाळा (प्रतिनिधी): करमाळा नगरपालिकेच्या मालकीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमधील गाळा क्रमांक ३३ ची पाडलेली भिंत पुन्हा बांधून मिळावी, तसेच या गाळ्याचे उतारे, नकाशे, चतुःसीमा, एम.बी. रेकॉर्ड आणि कायदेशीर अभिलेख उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी पत्रकार संजय कुलकर्णी यांनी सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ पासून करमाळा नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शॉपिंग सेंटरमधील गाळा क्रमांक ३३ ची मधली भिंत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या पाडून शेजारील गाळा क्रमांक ११ च्या मागील जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या प्रकरणी संजय कुलकर्णी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर कुलकर्णी यांनी गाळा क्रमांक ३३ चे उतारे, नकाशे व चतुःसीमा यांची अधिकृत मागणी केली; परंतु ती कागदपत्रेही देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली. अखेर प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरोधात त्यांनी १६ नोव्हेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
तबरेष सय्यद यांनी २०१३ मध्ये हा गाळा घेतला होता. मात्र, तब्बल १३ वर्षांनंतर म्हणजेच १६ एप्रिल २०२६ रोजी गाळा क्रमांक ३३ व गाळा क्रमांक ११ च्या मागील जागेची मधली भिंत पाडण्यात आली. या प्रकाराची पूर्वकल्पना कुलकर्णी यांनी नगरपालिकेला दिली होती. त्यानुसार नगरपालिकेचे शिपाई श्री. राक्षे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व संबंधित भाडेकरूला भिंत न पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या, परंतु भाडेकरूने त्याकडे दुर्लक्ष करत भिंत पाडली.
या प्रकारानंतर नगरपालिकेच्या कर निर्धारण व मिळकत व्यवस्थापक सुप्रिया महादेव पालखे यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून दिनांक १२ मे २०२६ रोजी बांधकाम विभागाला सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालाला अनेक महिने उलटून गेले तरी बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केलेली नाही.
त्याचबरोबर, गाळा क्रमांक ३३ चे प्लॅन एस्टिमेट, एम.बी. रेकॉर्ड, उतारे आणि चतुःसीमा देण्यासही नगरपालिकेकडून नकार दिला जात आहे. या सर्व बाबी तात्काळ मिळाव्यात व अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आपण उपोषणास बसत असून, या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील, असा इशारा संजय कुलकर्णी यांनी आपल्या अर्जात दिला आहे.