दिवाळीत असाही माणुसकीचा गोडवा! अमळनेरचे ट्राफिक हवालदार संजय बोरसे यांनी मुलांसह गरजूंची दिवाळी केली गोड
अमळनेर : विक्की जाधव.
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण; मात्र हा आनंद प्रत्येकाच्या वाट्याला यावा, या भावनेतून अमळनेर पोलीस स्टे चे शहर ट्राफिक हवालदार संजय रमेश बोरसे यांनी आपल्या मुलांसह सामाजिक बांधिलकी जपत आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. संजय बोरसे, त्यांची मुलगी पियुषा संजय बोरसे आणि मुलगा जित संजय बोरसे यांनी गुळ बाजार परिसरात हमाली करून उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी व गरजू नागरिकांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

या उपक्रमासाठी बोरसे यांच्या मुलांनी स्वतः घरी दिवाळीचा फराळ तयार करून त्याचे प्रेमाने पॅकिंग केले. लाडू, चिवडा, करंजी, सोनपापडी, फरसाण यांसह विविध फराळाच्या पदार्थांचे पॅक तयार करून गुळ बाजारातील गरजू व कष्टकरी बांधवांना त्याचे वाटप करण्यात आले.

स्वतःच्या हाताने फराळाचे पॅकिंग करून ते गरजूंपर्यंत पोहोचविणाऱ्या पियुषा आणि जित यांच्या या उपक्रमातून लहान वयातच सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची शिकवण जपली जात असल्याचे दिसून आले.. दिवसभर कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या हमाल बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेत त्यांच्या हातात दिवाळीचा फराळ देताना बोरसे कुटुंबीयांनी माणुसकीचा गोडवा अनुभवला. पोलीस दलातील कर्तव्य बजावत असतानाच सामाजिक संवेदनशीलता जपणाऱ्या संजय बोरसे आणि त्यांच्या मुलांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, ‘आपला आनंद इतरांसोबत वाटू तरच दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होते’असे त्यांनी सांगितले