बारामतीच्या वीर जवानाचा अकाली मृत्यू; सोनगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अखेरच्या निरोपासाठी जनसागर!

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-11-20 at 12.43.04 PM

बारामतीच्या वीर जवानाचा अकाली मृत्यू; सोनगावमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अखेरच्या निरोपासाठी जनसागर!

बारामती,प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या बारामती तालुक्यातील जवानाच्या निधनाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. सोनगाव येथील रहिवासी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत असलेले वीर जवान विशाल दिलीप रोमन यांचे मंगळवारी (दि. १८) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनगावसह संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. आज (20 नोव्हेंबर)त्यांच्या पार्थिवावर सोनगाव येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना देत अखेरची सलामी दिली.

🟡सुट्टीसाठी गावी आले होते विशाल रोमन

विशाल दिलीप रोमन हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सुट्टीसाठी आपल्या सोनगाव या मूळ गावी आले होते. सुट्टीच्या निमित्ताने त्यांनी आठवडाभर आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवले. कुटुंबीयांसोबत वेळ घालवल्यानंतर ते पत्नी आणि मित्रांसोबत केरळ येथे फिरण्यासाठी गेले होते. मात्र, आनंदाने सुरू असलेल्या या प्रवासाला अचानक दुःखद वळण लागले.

🔸चहा-बिस्किट घेतल्यानंतर काळाचा घाला

मंगळवारी (दि. १८) सकाळी चहा-बिस्किट घेतल्यानंतर ते निघाले असता अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विशाल यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना वाचवण्यासाठी उपस्थितांनी धावपळ केली. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही काळाने घाला घातला आणि विशाल रोमन यांची प्राणज्योत मालवली. या अनपेक्षित घटनेने कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

🟢शासकीय इतमामात अखेरचा निरोप; सीआरपीएफ जवानांची मानवंदना

विशाल रोमन यांचे पार्थिव सोनगाव येथे आणण्यात आल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आपल्या गावच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी सोनगावसह परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना देत आपल्या सहकाऱ्याला अखेरची सलामी दिली. अंत्ययात्रेत सहभागी झालेला जनसागर आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत तरळणारे अश्रू पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. जड अंतःकरणाने ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला.

🔷विशाल यांच्या पश्चात परिवारावर दुःखाचा डोंगर

विशाल रोमन यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन भाऊ, भावजया आणि लहान पुतणे असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार आणि गावचा लाडका सुपुत्र हरपल्याने रोमन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या जवानाचे असे अकाली जाणे ही संपूर्ण गावासाठी कधीही न भरून निघणारी हानी आहे. विशाल रोमन यांच्या निधनाने सोनगावने आपला एक लाडका सुपुत्र गमावला असून, त्यांच्या आठवणी सदैव ग्रामस्थांच्या मनात जिवंत राहतील.

देशसेवेच्या वाटेवर कार्यरत असलेल्या वीर जवान विशाल दिलीप रोमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि रोमन कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!