फोटोशॉपच्या करामतीने बनावट बांधकाम परवानग्यांचा गोरखधंदा कोणाच्या सांगणमताने?
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात नगरपरिषदेच्या नावाने बनावट बांधकाम परवानग्या आणि बनावट चलन पावत्या तयार करून पालिका तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही खासगी अभियंत्यांनी नागरिकांकडून बांधकाम परवानगीच्या नावाखाली पैसे घेत, त्यांना पालिकेत न आणता आणि त्यांचे अर्ज अधिकृत प्रक्रियेत दाखल न करता फोटोशॉपच्या माध्यमातून परवानग्या व पावत्या तयार करून दिल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे काही नागरिकांनी या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांकडून कर्जही मंजूर करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
बांधकाम परवानगीसाठी काही नागरिक पालिकेत आल्यानंतर त्यांच्या परवानग्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरच दिसत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिका प्रशासनाने चौकशी केली असता एका खासगी अभियंत्याने अधिकृत परवानगी आणि पावतीच फोटोशॉपमध्ये एडिट करून नागरिकांना कागदपत्रे दिल्याचा प्रकार समोर आला. आतापर्यंत तब्बल ६० ते ७० प्रकरणे उघडकीस आली असून, या संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालिकेचे शुल्क बुडवून शासनाचा महसूल बुडविण्याबरोबरच नागरिकांकडून घेतलेले पैसे स्वतःच्या खिशात घालण्यात आल्याचा आरोप असल्याने या संपूर्ण प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर नगरपरिषदेने नागरिकांना सावध करण्यासाठी नोटीस प्रसिद्ध केली असून, बांधकाम परवानग्या क्यूआर कोडच्या माध्यमातून तपासण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच संबंधित प्रकरणांची माहिती बँकांनाही देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली बांधकाम परवानगी अधिकृत बीपीएमएस प्रणालीवर नोंदलेली आहे किंवा नाही, याची खात्री करूनच पुढील व्यवहार करावेत, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. अधिकृत प्रक्रियेत नसलेल्या परवानग्या ग्राह्य धरल्या जाणार नसल्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम करणाऱ्या नागरिकांवरही कारवाईची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून या प्रकरणातील संबंधित अभियंते व दलालांची नावे समोर आणावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषद आणि नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्य सर्व अभियंते व दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर रीतसर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी दिला आहे. मुख्याधिकारी व बांधकाम अभियंत्यांना यासंदर्भात आदेश देऊन योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कथित बनावट परवानग्यांच्या गोरखधंद्यात नेमके किती जण सहभागी आहेत आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याकडे आता अमळनेरकरांचे लक्ष लागले आहे.