करमाळा (प्रतिनिधी) : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतीबाबतची सर्व कामे गावातील तलाठी म्हणजेच आजचा ग्राममहसूल अधिकारी हा शेतकरी आणि महसूल प्रशासन यांना जोडणारा महत्वपूर्ण दुवा असतो. परंतु रामवाडी व कावळवाडी या दोन ग्रामपंचायती मध्ये मात्र हा दुवा निरुपयोगी ठरत असल्याचा सनसनाटी आरोप ग्रामस्थानी केला आहे. रामवाडी व कावळवाडी गावाचा कार्यभार सांभाळणारे तलाठी संजय शेटे यांच्या कथित मनमानी कारभार, उर्मट भाषाशैली आणि गैरवर्तणुकीमुळे ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत. या तलाठ्याची तात्काळ बदली करावी, अशी मागणी रामवाडी ग्रामस्थांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या १० दिवसांत कारवाई न झाल्यास ४ तारखेला धरणे आंदोलन व उपोषण छेडण्याचा कडक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गेल्या आठ वर्षांपासून संबंधित तलाठी संजय शेते यांच्याकडे रामवाडी व कावळवाडीचा चार्ज कायम ठेवण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित असतानाही प्रशासनाकडून त्यांनाच पुन्हा त्याच गावांची जबाबदारी दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूर्वी जिंती येथे कार्यभार असताना तिथेही एक प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना पुन्हा रामवाडी-कावळवाडीचा पदभार देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतीशी निगडित कामे असताना तलाठी पंधरा दिवस ते महिनाभर गावात येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वेळेवर पंचनामे होत नसणे, महसूल नोंदी प्रलंबित राहणे आणि किरकोळ कामांसाठी शेतकऱ्यांना करमाळ्याला वारंवार हेलपाटे मारावे लागणे यांसारख्या समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आणि नागरिकांशी उद्धट भाषेत बोलले जाते. तसेच काही ठिकाणी हॉटेलमध्ये मद्यपान करणे, ग्रामपंचायत कार्यालयात महिलांशी अयोग्य वर्तन करणे यांसारख्या गंभीर तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या असून, याबाबत फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे जोडल्याचा दावा निवेदनात केला आहे. त्याच प्रमाणे वाळू, मुरूम याबाबत ही नागरिकानी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली असून लवकरच त्याबाबत हि मोठा खुलासा केला जाणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले. त्याच प्रमाणे सदर तलाठी शेटे यांना शेतकाऱ्यांच्या प्रश्नाबाबत जाब विचारल्यास ते आम्हाला वारंवार धमकी वजा इशारा देत म्हणत असतात की, महसूल / तलाठी संघटनेच्या तालुका पदावर मी कार्यरत असल्याने मला कोणाच्याही तक्रारीने कोणताही फरक पडत नाही तसेच माझ्यावर कोणतीही कार्यवाही तर लांबच परंतु माझी साधी बदलीही होऊ शकत नाही, उगाच ८ वर्षे मी एक ठिकाणी कार्यरत नाही, असेही यावेळी ग्रामस्थानी सांगितले आहे.
वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावून फिरण्यावरूनही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तलाठी दर्जाच्या कर्मचाऱ्याला अशा प्रकारे पाटी लावण्याचा अधिकार आहे का, असा सवाल करत आरटीओ नियमांच्या भंगाचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे.
तहसीलदार मॅडम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन देण्याबाबत सांगितले होते. मात्र त्या कार्तिक वारीसाठी गेल्या असल्याने ग्रामस्थांनी आपले निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केले. या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही देण्यात आली आहे.
“आम्ही कुणाचेही नुकसान न करता केवळ संबंधित तलाठ्याची तात्काळ बदली करावी, अशी मागणी करत आहोत. १० दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास ४ तारखेला समस्त ग्रामस्थांसह धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येईल. तसेच बदली न झाल्यास सर्व पुरावे घेऊन महसूल मंत्र्यांकडे धाव घेऊ,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.