अखेर अमळनेर चा कत्तलखाना सील, विश्वहिंदू परिषद बजरंगदल च्या मागणीला यश..
अमळनेर : विक्की जाधव.
कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सतत दोन दिवस कत्तलखान्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करतांना व कत्तल केलेले मांस , कातडी, शिंगे पोलिसांच्या पथकाला आढळून आले होते. सुमारे ५७० किलो मांस आढळून आल्याने शहरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. बजरंग दल ,विश्वहिंदू परिषद तसेच गोरक्षकानी अमळनेर नगर पालिकेला निवेदन देऊन संताप व्यक्त करत कत्तलखाना कायम स्वरूपी बंद करून उध्वस्त करण्याची मागणी केली होती. आठ दिवसात कारवाई न केल्यासमोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता.
या प्रकरणाची दखल घेऊन अमळनेर शहरात धार्मिक भावना भडकून अनर्थ घडू नये तसेच हिंदू संघटनांच्या भावनांचा आदर करत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी नगरसेवकांसह अधिकारी वर्गाशी चर्चा केली. आदेशाचे उल्लंघन केल्याने आणि पुढील कठोर कारवाई होण्यापूर्वी कत्तलखाना सील करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
त्यानुसार प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी आरोग्य विभागाला आदेश दिले. आणि कत्तलखाना सील केला आहे आता पुढे विश्वहिंदू परिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.