खंडणी, दमदाटी व दादागिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई; उद्योगांसाठी सुरक्षित वातावरणाची ग्वाही
शिक्रापूर, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवारी शिक्रापूर एमआयडीसीतील विविध कंपन्यांचे एचआर व्यवस्थापक व प्रतिनिधी यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. उद्योगांना सुरक्षित, भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी देण्यात आला.
बैठकीत औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था तसेच कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लेबर, स्क्रॅप, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, सिक्युरिटी, हाऊसकिपिंग, पाणी टँकर किंवा इतर कोणत्याही कामांचे ठेके मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही व्यक्ती किंवा संघटना बेकायदेशीर दबाव टाकत असेल, पैसे अथवा खंडणीची मागणी करत असेल किंवा दमदाटी करत असेल, तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला.
यावेळी एमआयडीसी परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, कंपनी परिसरात नियमित पोलीस गस्त वाढविणे, वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नियोजन, कामगारांची लुटमार रोखण्यासाठी विशेष लक्ष देणे, तसेच परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती व नोंदी अद्ययावत ठेवण्याबाबत कंपन्यांना सूचना करण्यात आल्या.
उद्योग-व्यवसाय सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू राहावेत यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडून २४ तास आवश्यक ते सहकार्य व संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. तसेच कोणतीही संशयास्पद घटना अथवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास विलंब न करता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत क्रोमवेल इंजिनिअरिंगचे नीलेश गव्हाणे, संदीप दिवेकर, जॉन डीअरचे राम अहिरे, अलिकॉनच्या श्रीमती जाधव, हर्ष ओगलचे मारुती पाटील, मॅक अल्टीचे असलम परवेज यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी उद्योग क्षेत्रातील विविध समस्या पोलिसांसमोर मांडल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, उपनिरीक्षक हनुमंत गिरी, उपनिरीक्षक तुषार भोर, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे आणि बापू जगताप उपस्थित होते.