कायदा-सुव्यवस्थेला धोका ठरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; इम्रान शेख हद्दपार
अमळनेर : विक्की जाधव.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमळनेर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शाह आलम नगर येथील इम्रान शेख सलीम (वय २७) याला उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांच्या आदेशाने सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अमळनेर तालुक्यातील गुन्हेगारांचा आढावा घेतला आहे. आगामी ईद, रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजात दहशत निर्माण करणारे, दादागिरी व गुंडगिरी करणारे तसेच कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.
इम्रान शेख सलीम याच्यावर तीन गुन्हे दाखल असून ईदच्या मिरवणुकीत दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्याच्या कृत्यांमुळे सामाजिक शांततेला बाधा निर्माण होत असल्याने पोलिसांनी त्याला जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून तसेच गोपनीय साक्षीदारांची माहिती तपासल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(अ)(ब) अन्वये इम्रान शेख सलीम याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश २१ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
“वारंवार गुन्हेगारी कृत्य करून अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा व सुव्यवस्था भंग करून सामान्य जनतेस वेठीस धरणाऱ्या व्यक्तींवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा डीवायएसपी विनायक कोते यांनी दिला आहे.