महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा उपाध्यक्षपदी ‘लोक जागर न्यूज’चे संपादक हृदयनाथ मोरे यांची निवड
अमळनेर : विक्की जाधव.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खानदेशी विभागांतर्गत अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ‘लोक जागर न्यूज’चे संपादक तथा पत्रकार हृदयनाथ मोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश संघटक संजयजी भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. खानदेशी विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करत हृदयनाथ मोरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी संघटित प्रयत्नांची गरज असताना अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच समाजहिताच्या विषयांना प्राधान्य देणे, यासाठी कार्यकारिणी सक्रियपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. हृदयनाथ मोरे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.