CEO/BOSS Fraud प्रकरणात सिमकार्ड पुरविणारे दोघे अटकेत; १६१ सिमकार्डसह साहित्य जप्त
मुंबई : दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी CEO/BOSS Fraud प्रकरणात सिमकार्ड पुरविणारे POS व त्याचा हस्तक अशा दोघांना बिहार व झारखंड येथून अटक केली आहे. आरोपींकडून १६१ एअरटेल सिमकार्ड, मोबाइल फोन, मेगाफोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्या सहभागातून सात सायबर गुन्हे निष्पन्न झाले आहेत.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एका ४३ वर्षीय व्यक्तीशी अज्ञात इसमाने व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. आपण कंपनीचा डायरेक्टर असल्याचे भासवून विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने फिर्यादीकडून तब्बल ४८ लाख ६० हजार ५११ रुपये पाठवून घेतले. याप्रकरणी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम होल्ड करण्यात पोलिसांना यश आले.
तपासात या फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली सिमकार्डे महाराजगंज, बिहार येथील नागरिकांच्या कागदपत्रांचा व ई-केवायसीचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या सक्रिय करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सिवान, बिहार येथील एअरटेल सिम विक्रेता आमीर चांद मोहंमद खान (वय २२) याने ग्राहकांच्या नकळत सिमकार्ड सक्रिय करून त्यापैकी आठ सिमकार्ड सूरज कुमार प्रदीप कुमार साव उर्फ विशाल याला ६ हजार रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी आमीर खान याला रुकुंदीपूर, सिवान, बिहार येथून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून दुसरा आरोपी सूरज कुमार प्रदीप कुमार साव उर्फ विशाल याला १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुमारधुबी, धनबाद, झारखंड येथून अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींच्या चौकशीत अशाच प्रकारचे सात सायबर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, मुंबई येथील दोन गुन्ह्यांसह पंजाब, गुरुग्राम (हरियाणा), नवी दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू येथील प्रत्येकी एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे NCRP तक्रारींच्या आधारे समोर आले आहे.
जप्त मुद्देमाल
– १६१ एअरटेल सिमकार्ड
– मेगाफोन
– ‘एअरटेल मित्र’ अॅप असलेला POCO कंपनीचा मोबाइल
– सिमकार्ड सक्रिय करण्यासाठी वापरले जाणारे इतर साहित्य
अटक आरोपी
१) आमीर चांद मोहंमद खान (वय २२)
रा. रुकुंदीपूर, सिवान, बिहार — एअरटेल सिम वितरक
२) सूरज कुमार प्रदीप कुमार साव उर्फ विशाल
रा. कुमारधुबी, धनबाद, झारखंड
सायबर फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावर ओळखीच्या व्यक्तीचा फोटो ठेवून पैसे पाठविण्यास सांगितल्यास, संबंधित व्यक्तीशी नेहमीच्या क्रमांकावर संपर्क साधून खात्री करावी. सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. आपल्या नावावर सिमकार्ड घेऊन ते दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये तसेच आपल्या नावावर किती सिमकार्ड जारी झाली आहेत, याची Sanchar Saathi Portal वर तपासणी करावी.
ही प्रशंसनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (सायबर गुन्हे) श्री. बजरंग बनसोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सायरस इराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गोपाळे, स.पो.नि. रामदास गोपाळ व पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.