बारामतीच्या स्वच्छतेत नवे पर्व; नगरपरिषदेला १ कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-07-03 at 12.48.41 PM (1)

बारामतीच्या स्वच्छतेत नवे पर्व; नगरपरिषदेला १ कोटींची अत्याधुनिक सीवर मशीन

बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

WhatsApp Image 2026-07-03 at 12.48.41 PM

बारामती शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून, नगरपरिषदेला राज्य शासनाकडून सुमारे एक कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक कंबाईंड सीवर सक्शन, जेटिंग आणि डीवॉटरिंग मशीन उपलब्ध झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे ही मशीन बारामतीला मिळाली असून, त्यांच्या आगामी बारामती दौऱ्यात या वाहनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या “मॅनहोलकडून मशीनहोलकडे” या योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या या मशीनमुळे मॅनहोल, भूमिगत गटारे, मलजल वाहिन्या, सेप्टिक टाक्या, सिव्हेज टाक्या तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून गटारात उतरावे लागणार नसून त्यांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे.

१८ टन क्षमतेच्या चेसिसवर उभारण्यात आलेल्या या वाहनात ८ हजार लिटर क्षमतेची टाकी, ३,००० घनमीटर प्रतितास क्षमतेचा व्हॅक्यूम पंप, १७० बार दाबाचा हाय-प्रेशर जेटिंग पंप आणि ४ हजार लिटर प्रतिमिनिट क्षमतेचा डीवॉटरिंग पंप बसविण्यात आला आहे. त्यामुळे सीवर लाईनमधील गाळ काढणे, तुंबलेली गटारे मोकळी करणे, चेंबर साफ करणे आणि पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा जलद उपसा करणे अधिक वेगाने व कार्यक्षमतेने शक्य होणार आहे.

बारामतीतील अनेक सीवर चेंबर्स १० ते १५ फूट खोल असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सकारात्मक निर्णयामुळे बारामतीला ही अत्याधुनिक सुविधा मिळाली.

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी स्वच्छ, सुंदर आणि हरित बारामतीची संकल्पना राबविताना आधुनिक स्वच्छता व्यवस्थेला प्राधान्य दिले होते. त्याच संकल्पनेला पुढे नेत बारामतीच्या स्वच्छता व्यवस्थेला तांत्रिक बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे नगराध्यक्ष सचिन सातव आणि आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी सांगितले.

या मशीनमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि परिणामकारक होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत पाणी उपसा करण्याचे कामही जलद गतीने करता येणार असल्याने बारामतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!