बारामतीत अंमली पदार्थांविरोधात जनजागृती; विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा घेतला संकल्प
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
बारामती तालुका पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ जनजागृती मोहिमेअंतर्गत विद्या प्रतिष्ठान कॉलेज, विद्यानगरी, बारामती येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. १ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून स्वतःसह समाजालाही व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अंमली पदार्थांची विक्री किंवा बेकायदेशीर व्यवहारांची माहिती पोलिसांना गोपनीय पद्धतीने देण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनाही करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य भारत शिंदे, उपप्राचार्य अंकुश खोत, पोलिस उपनिरीक्षक शिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक बगाडे, पोलिस अंमलदार वाकळे, महिला पोलिस अंमलदार पोतेकर तसेच ज्योती जगताप, अंकिता चौधर, नाझनीन खान, मुक्ता कडणे आदी उपस्थित होते.