‘सात फेऱ्यांत आयुष्यभराच्या साथीचे वचन’… दिव्यांग सुप्रियाला उचलून वडाभोवती फेऱ्या; राहुलच्या कृतीने भारावला परिसर
८५ टक्के दिव्यांगत्वावर जिद्दीने मात करत शिक्षण पूर्ण; तलाठी परीक्षाही दिली… आता समाजाकडून तिच्या गुणवत्तेची दखल घेण्याची अपेक्षा
बारामती, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

आयुष्यात काही क्षण असे असतात, जे शब्दांपेक्षा कृतीतून प्रेम, विश्वास आणि माणुसकीची व्याख्या करून जातात. बारामती तालुक्यातील शिवनगर येथे अशाच एका हृदयस्पर्शी प्रसंगाने अनेकांचे डोळे पाणावले. ८५ टक्के दिव्यांग असलेल्या सुप्रियाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाभोवती सात फेऱ्या मारणे शक्य नव्हते. त्या वेळी तिचे पती राहुल पवार यांनी तिला अलगद उचलून घेतले आणि सातही फेऱ्या पूर्ण केल्या. हा केवळ एक विधी नव्हता, तर प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याचा शब्दांविना दिलेला विश्वास होता.
माळेगाव बुद्रुक (शिवनगर) येथील एसटी चालक विजय संपतराव सस्ते यांची कन्या सुप्रिया आणि शिवनगर येथील उत्तमराव सर्जेराव पवार यांचे चिरंजीव राहुल यांचा विवाह २७ जून २०२६ रोजी शिवमंगल मंगल कार्यालयात संपन्न झाला. विवाहानंतर अवघ्या दोन दिवसांनी आलेल्या पहिल्या वटपौर्णिमेला घडलेला हा प्रसंग उपस्थितांच्या कायम स्मरणात राहिला.
सुप्रियाचा जीवनप्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. ८५ टक्के दिव्यांगत्व असूनही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही. पदवी शिक्षण पूर्ण केले, संगणक विषयातील पदवी मिळवली आणि नुकतीच तलाठी भरती परीक्षाही दिली. शारीरिक मर्यादांपेक्षा मनाची ताकद मोठी असते, हे तिने आपल्या जिद्दीने सिद्ध करून दाखवले आहे.
राहुल यांनीही विवाह करताना केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर तिच्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा स्वीकार केला. वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नीला उचलून सात फेऱ्या मारण्याच्या त्यांच्या कृतीने “साथ म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर कृती” हे अधोरेखित केले.
आज सुप्रिया ही समाजातील अनेक दिव्यांग तरुण-तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तिचे शिक्षण, चिकाटी आणि स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास पाहता, गुणवत्तेच्या बळावर तिला संधी मिळावी, तिच्या क्षमतेची योग्य दखल घ्यावी आणि दिव्यांग व्यक्तींना समान संधी देण्याचा संदेश समाजाने कृतीतून जपावा, अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.