लोकसहभागाची जलक्रांती आणि राजकीय श्रेयवाद…
विकासाचा खरा अर्थ काय?…
जनमत-संपादकीय विशेष
दोंडाईचा-
शिंदखेडा परीसरातील सुराय-अक्कलकोस भागात लोकसहभागातून झालेल्या नाली खोलीकरणाच्या कामाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या कामामुळे पाऊसाचे पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या शेतीला दीर्घकालीन आधार मिळवून देणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी ना शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा करण्यात आली, ना कोणत्या मंत्री, आमदार किंवा अधिकाऱ्याच्या मंजुरीची गरज भासली. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवले.
मात्र या कामाची दखल घेतल्यानंतर काही जणांनी असा मुद्दा उपस्थीत केला की, “या भागासाठी यापूर्वी मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी अनेक विकासकामे केली आहेत. मग त्यांचा उल्लेख का नाही?” हा प्रश्न वरवर पाहता रास्त वाटत असला तरी त्यामागील व्यापक वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.
सदर भागात माननीय पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री यांच्या माध्यमातून १५ ते २० बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व खोलीकरणास मंजुरी मिळाल्याचे सांगीतले जाते. गेल्या काही पाच वर्षांत सुराय ग्रामपंचायत हद्दीत शेकडो घरकुल मंजूर झाले.अक्कलकोस येथे सुमारे सात कोटी रुपयांची आदिवासी आश्रमशाळा उभी राहीली. ठेलारी वस्तीत पोल, डीपी आणि वीजपुरवठ्याच्या सुवीधा उपलब्ध झाल्या. अक्कलकोस-खर्दे मार्गावर कोट्यवधी रुपयांचा रस्ता मंजूर झाला. अनेक आदिवासी कुटुंबांना विहिरींचा लाभ मिळाला. ही सर्व कामे निश्चितच महत्त्वाची आहेत आणि त्यांचे श्रेय संबंधीत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला द्यायलाच हवे.
परंतु येथे मूळ प्रश्न श्रेयाचा नसून विकासाच्या सातत्याचा आहे.जर एखाद्या गावात घरकुले झाली म्हणून पुढे घरांची गरजच संपते का?एखादा रस्ता बांधला म्हणून त्याची भविष्यात दुरुस्ती करावी लागत नाही का?शाळा बांधली म्हणून शिक्षणाच्या नवीन गरजा निर्माण होत नाहीत का? विहिरी दिल्या म्हणून पाण्याचा प्रश्न कायमचा सुटतो का? उत्तर अर्थातच “नाही” असे आहे. मग लोकसहभागातून झालेल्या नाली खोलीकरणाच्या कामाबाबत एवढी अस्वस्थता का? खरे तर शासन आणि लोकसहभाग हे विकासाच्या रथाची दोन चाके आहेत. शासन मूलभूत सुवीधा निर्माण करते, तर समाज त्या सुवीधांना अधिक प्रभावी बनवतो. एखाद्या शेतकऱ्याला घरकुल मिळाले म्हणून त्याने शेती करणे थांबवावे का? गावात शाळा बांधली म्हणून पालकांनी मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी सोडावी का? हा विचार जितका हास्यास्पद वाटतो, तितकेच लोकसहभागातून जलसंधारणाचे काम झाल्यावर त्याची तुलना पूर्वीच्या विकासकामांशी करून त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न देखील चुकीचा ठरतो.
भारतीय राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्थेचे सौंदर्य हेच आहे की, राज्य एकाच व्यक्तीवर किंवा एका मंत्र्यावर चालत नाही. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र यंत्रणा आणि स्वतंत्र जबाबदाऱ्या असतात. जलसंधारणाचा विषय वेगळा, शिक्षणाचा वेगळा, रस्त्यांचा वेगळा आणि आदिवासी विकासाचा वेगळा. त्यामुळे एखाद्या जलसंधारण उपक्रमाचे कौतुक झाले म्हणजे इतर विकासकामांचे अवमूल्यन झाले, असा अर्थ काढणे योग्य नाही.उलट लोकसहभागातून उभी राहीलेली ही जलक्रांती शासनासाठी प्रेरणादायी आहे. कारण येथे निधीपेक्षा इच्छाशक्ती मोठी ठरली. आदेशापेक्षा सहभाग मोठा ठरला.राजकारणापेक्षा समाजकारण मोठे ठरले आहे.
आज महाराष्ट्रात दरवर्षी जलयुक्त शिवार, जलसंधारण, नाला खोलीकरण, बंधारे, सिंचन अशा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. कारण विकास ही एकदाच होणारी घटना नसून सतत सुरू राहणारी प्रक्रीया आहे. काल बांधलेला रस्ता आज दुरुस्त करावा लागतो, आज खोदलेली नाली उद्या पुन्हा स्वच्छ करावी लागते, आणि आज उपलब्ध असलेले पाणी उद्या वाढत्या गरजांसाठी अपुरे पडू शकते.म्हणूनच विकासाचा खरा अर्थ केवळ मंजूर निधी, फलक किंवा उद्घाटन समारंभात नसतो. विकासाचा खरा अर्थ लोकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलात असतो.
सुराय-अक्कलकोस परीसरातील नाली खोलीकरणाचा उपक्रम हेच सांगतो की, लोक एकत्र आले तर शासनाच्या मदतीशिवायही परिवर्तन घडवू शकतात. आणि शासन जर अशा लोकसहभागी उपक्रमांना साथ देत असेल तर विकासाचा वेग अनेकपटीने वाढू शकतो.आज गरज आहे ती “माझा मंत्री”, “माझा नेता” अशा संकुचित विचारांपासून बाहेर पडण्याची. कारण व्यक्तीपेक्षा व्यवस्था मोठी असते, आणि व्यवस्थेपेक्षा मोठी असते जनतेची सामूहीक ताकद.
सुराय-अक्कलकोसच्या मातीतून उमललेली ही जलक्रांती हेच शिकवते की, विकासाचा पाया श्रेयवादावर नव्हे तर सहभाग, दूरदृष्टी आणि सामूहीक जबाबदारीवर उभा असतो आणि म्हणूनच या उपक्रमाचे कौतुक हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसून, घाम गाळणाऱ्या त्या शेतकऱ्यांचे, फावडे उचलणाऱ्या त्या युवकांचे आणि “गावाचा प्रश्न हा आपला प्रश्न आहे” असे मानणाऱ्या प्रत्येक नागरीकाचे आहे. हाच लोकशाहीचा आत्मा आणि हाच खऱ्या विकासाचा मार्ग आहे.