उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला; पण आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार का? रुग्णांना अजूनही दाखवली जातेय धुळ्याची वाट!
अमळनेर : विक्की जाधव.
ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल २० नवीन पदांना मंजुरी मिळाली असून यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असले, तरी “केवळ पदांची मंजुरी म्हणजे आरोग्य सेवा सक्षम झाली का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण, आजही अनेक गंभीर रुग्णांना धुळे गाठावे लागत असल्याची वस्तुस्थिती बदललेली नाही.
काही महिन्यांपूर्वी आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी रुग्णालयातील स्वच्छता आणि औषधांचा दर्जा पाहून त्यांनी “हेच औषध बघून मला उलटी होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
लोकप्रतिनिधींनाच रुग्णालयातील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त करावी लागत असेल, तर सामान्य रुग्णांची अवस्था काय असेल, असा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रुग्णालयाची नवीन इमारत, अतिरिक्त पदे आणि मोठमोठ्या घोषणा यापलीकडे जाऊन आता नागरिकांना प्रत्यक्षात २४ तास उपलब्ध डॉक्टर, कार्यरत ऑपरेशन थिएटर, प्रसूती सेवा, आयसीयू, औषधांचा पुरेसा साठा आणि तातडीची उपचार व्यवस्था हवी आहे. कारण, आपत्कालीन परिस्थितीत “रुग्णाला धुळ्याला रेफर करा” हे वाक्य आजही अनेक कुटुंबांसाठी धक्कादायक ठरत आहे. २० पदांची मंजुरी हा निश्चितच सकारात्मक निर्णय असला, तरी आता नागरिकांना फक्त कागदी घोषणा नव्हे तर परिणाम पाहायचे आहेत. कारण रुग्णालयाची खरी ओळख भव्य इमारतीने नाही, तर वेळेवर मिळालेल्या उपचारांनी आणि वाचलेल्या जीवांनी ठरत असते.