ग्रामपंचायत सदस्यांच्या तुटपुंज्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर; मानधन वाढवण्याची शासनदरबारी मागणी
ग्रामपंचायत सदस्यांच्या आर्थिक स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी – दिवाकर कडू
रजत डेकाटे प्रतिनिधी
मार्मिक समाचार नागपूर वृत्तसेवा
नागपूर: -ग्रामपंचायत सदस्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन आणि वाढत्या महागाईचा विचार करता, सदस्यांना न्याय्य मानधन मिळावे, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा धापेवाडा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. दिवाकर वसंत कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मानधनातील तफावत आणि महागाईचा फटका
दिवाकर कडू ग्रामपंचायत सदस्य धापेवाडा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या १८ वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्यांना केवळ २०० रुपये प्रति महिना मानधन मिळत आहे. ५ वर्षांच्या कार्यकाळात ही रक्कम केवळ १२,००० रुपये इतकी होते. सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शिक्षण, आरोग्य, वीज बिल, गॅस आणि घरपट्टी यांसारख्या अत्यावश्यक खर्चात या मानधनातून कोणतीही मदत होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीसाठी एका उमेदवाराला ५०,००० रुपयांपर्यंत खर्च येतो, मात्र निवडून आल्यानंतर मिळणारे मानधन अत्यंत कमी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडवताना लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना सामाजिक भूमिकेमुळे होणारा खर्च आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना होणारी ओढाताण यामुळे सदस्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे पत्रात म्हटले आहे.
ग्रामपंचायत सदस्यांच्या आर्थिक स्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी दिवाकर कडू यांनी केल्याने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींच्या मानधनाचा प्रश्न आता चर्चेत आला आहे.