शिक्रापूरच्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीएचा दणका; अकोला कारागृहात रवानगी

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-24 at 8.31.16 PM

शिक्रापूरच्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीएचा दणका; अकोला कारागृहात रवानगी

दहशत निर्माण करणाऱ्या ‘धोकादायक व्यक्ती’वर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर, प्रतिनिधी – वर्षा चव्हाण

औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या शिक्रापूर परिसरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सुरज उर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर) याच्यावर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली आहे. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार देडगे याला ‘धोकादायक व्यक्ती’ म्हणून स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शिक्रापूर परिसरातील वाढते औद्योगिकीकरण, आर्थिक व्यवहार आणि वाढलेली वर्दळ लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दहशत निर्माण करून गैरमार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हद्दीतील गुन्हेगारांचे अभिलेख तपासून वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली. त्यामध्ये सुरज उर्फ मोन्या देडगे याच्याविरुद्ध चंदननगर, शिरूर, नारायणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर दुखापत, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, शिवीगाळ व दमदाटीसह दुखापत अशा स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या देडगे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

या प्रस्तावाचा पाठपुरावा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस अंमलदार महेश बनकर तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे रोहिदास पारखे यांनी केला. प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी देडगे याला ‘धोकादायक व्यक्ती’ या प्रवर्गात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

आदेश प्राप्त झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी देडगे याचा दोन दिवस शोध घेत त्याला ताब्यात घेतले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

WhatsApp Image 2026-08-24 at 8.31.27 PM

एमआयडीसी परिसरातील दहशतगर्दी खपवून घेतली जाणार नाही

“शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात दहशत, दादागिरी किंवा गुंडगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उद्योजक, कामगार, व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन दबाव निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे. याबाबत माहिती मिळताच त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सतर्क आहेत.”

— संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

पोलिसांच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके आणि इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!