दौंड रेल्वे जंक्शनवर आगीचे तांडव! प्लॅटफॉर्म क्रमांक ३ अंधारात; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
दौंड | प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड रेल्वे जंक्शन येथे शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ परिसरात लागलेल्या आगीने काही वेळातच मोठा भडका घेतल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांना अंधाराचा सामना करावा लागला.
ब्रिटिशकालीन वारसा लाभलेले दौंड जंक्शन हे रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. येथून विविध महत्त्वाच्या मार्गांवर रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या रेल्वे स्थानकात रात्रीच्या वेळी आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आगीच्या घटनेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारची घटना घडणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. रेल्वे स्थानकावरील अग्निसुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या तयारीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, तिचे स्वरूप किती गंभीर होते आणि ती आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून आगीचे नेमके कारण स्पष्ट करावे, तसेच स्थानकावरील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.