पातोंडा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ ; पोलीस यंत्रणेसह,महसूल,लोक प्रतिनिधीवर शेतकऱ्यांची नाराजी.
अमळनेर : विक्की जाधव.
तालुक्यातील पातोंडा सह दहिवद शेती शिवारात शेतातील विहीर व बोअरवेलच्या केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असून चोरीच्या घटनांना पोलीस यंत्रणेकडून आळा बसत नसल्याने शेतकऱ्यांची पोलीस यंत्रणेवर नाराजी पसरली आहे.केबल सह गुरे चोरीचे प्रमाण देखील ह्या परिसरात वाढल्याने पोलिसांना मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पातोंडा सह दहिवद परिसरात रब्बी पिकासाठी शेतकऱ्यांना शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी दिवसा वीज उपलब्ध असते त्यामुळे शेतकऱ्यांना आता रात्री शेतात जाण्याची आवश्यकता नसते याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ह्या परिसरात विहीर,बोअरवेल मधील महागड्या अशा केबल काढून शेतातीलच ठिबक नळ्याची होळी पेटवून होळीत केबल वितळवून तांबे चोरी करत आहेत. अशा घटना दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतात सुरू असून यासंबंधीची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस व महसूल प्रशासन व लोक प्रतिनिधीकडे केल्यात.मात्र तरीही चोरीच्या घटना कमी न झाल्याने शेतकऱ्यांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडाला. ह्या सहा दिवसांत दोनदा चोरीच्या घटना घडून आल्यात.पिकांना पाणी देणे आवश्यक असताना शेतकऱ्यांनी उधारीने नवीन केबल आणून टाकल्या आणि चोरट्यांनी परत त्या नवीन केबलवरच डल्ला मारल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.त्यामुळे संतप्त शेतकरी प्रशासनाच्या विरोधात अमळनेर चोपडा महामार्गवर रास्ता रोको करण्याच्या प्रयत्नात होते. ही माहिती पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मिळताच ते संबंधीत शेतकऱ्यांना भेटण्यासाठी घटनास्थळी गेलेत.पोलिसांनी पंचनामा करून संबंधीत चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले असून रात्री पोलिसांची गस्त देखील लावण्याचे सांगितले.
सद्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट असून शेतकरी ह्या संकटावर मात करत असताना शेतातील यंत्र सामुग्री सह गुरे चोरीला जाणे हे शेतकऱ्यांना मारक आहे.हिवाळा सुरू झाल्याने चोरट्यांचा वावर वाढतो. चोरट्यांना पकडण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहेत.लोक प्रतिनिधीचेंही अशा घटनाकडे दुर्लक्ष होत असून शेतकऱ्यांना कुठंच न्याय मिळत नाही आहे.पोलिसांनी रात्री गस्त घालावी व केबल चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा व चोरी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशा मागणीचे निवेदन संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांना दिले आहे.चोरीच्या घटनांवर आळा न बसल्यास जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे दाद मागण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
फोटो